Sunday 12 August 2018

"जेथे जातो तेथे तू माझा सांगाती" (ज्योतिर्लिंग यात्रा २०१८) भाग: २


दिवस पहिला : २०/०६/२०१८
ठरल्याप्रमाणे मी २० तारखेला सकाळी बरोबर ८ वाजता देहरादून एयरपोर्ट बाहेर पोहचलो. 





तेथून वेळ न दवडता प्रायव्हेट टॅक्सीने ऋषिकेश गाठले. वाटेतच बाईक रेंटल वाल्याशी बोलणे केले. बरोबर ९ च्या सुमारास त्याच्या दुकानासमोर मी उभा ठाकलो. अजून दुकान उघडले नव्हते. बाहेर काही बाईक उभ्या होत्या. मी संभ्रमावस्थेत त्या न्याहाळू लागलो. इतक्यात  मागून मला आवाज आला . "आपने फोन किया था ? जी मेर नाम सुमित गोयल है ।" मी एक बुलेट निवडली. पुढे  सगळे पत्रव्यवहार केल्यानंतर मी पावणे दहाच्या सुमारास सगळे सोपस्कार म्हणजे उदी , लॉकेट आणि ललकारी देऊन केदारनाथच्या दिशेने कूच केली.


आता पर्यंत मी आणि वॉरहॉर्स म्हणजे "दो  जिस्म एक जान ". परंतु नवीन बाईक जरी बुलेट प्रजातीची असली तरी तिची आणि माझी सांगड काही केल्या बसेना. हॅन्डल पोजिशन, सीटिंग पोजिशन मला हवी तशी मिळत नव्हती. त्यात उत्तराखंड म्हणजे वळणावळणाचा रस्ता. पर्यायाने मी वेग हळूच ठेवला. पण मलाच ते रटाळवाणं वाटू लागला.

त्यात पावसाऐवजी उन्हानं कहर केला होता. सारंच अवघडून बसलं होत. ऋषिकेश ते गौरीकुंड जवळपास  २१० किमी चा प्रवास. पहाडी भागातील २१० किमी  म्हणजे जवळपास ६-८ तास लागतात. शिवाय नेहमीचे वाहन नसेल तर अजून पंचाईत होते. मी आजचा प्रवास तीन टप्प्यात पूर्ण करण्याचे  ठरिवले. पहिला टप्पा ऋषिकेश ते देवप्रयाग (७४ किमी), देवप्रयाग ते रुद्रप्रयाग  (६७ किमी), रुद्रप्रयाग ते गौरीकुंड (७२ किमी).

मजल दरमजल करत, बाईकशी बैठक जमवून घेत कसा बसा मी देवप्रयाग पर्यंत पोहचलो. अडीच तासात फक्त ७५ किमी चे अंतरच कापू शकलो. पण परिस्थितीचा आढावा घेता टाईमिंग बरा होता. उत्तराखंड मध्ये उन्हाळा जून महिन्यापर्यंत असतो. शाळेला सुट्टी देखील जून महिन्यापर्यंत असते. डोंगराळ भागातील उन्हाळा म्हणजे अक्षरशः हालत खराब. त्यात दुष्काळात तेरावा महिना म्हणजे नवीन बाईक, दर ५० मीटर अंतरावरील वळण, जागोजागी रस्त्याची कामं (चार धाम योजनेअंतर्गत). एव्हाना माझ्या कंबरेत चांगलीच उसण भरल्यागत मला वाटू लागलं.



पुढे एका वळणावर मी स्थिरावलो आणि चहूकडे नजर फिरवली आणि क्षणात सगळा क्षीण बाजूला सारला गेला. देवप्रयाग फारच सुंदर भासत होता. उत्तराखंडमधील आता पर्यंतच्या प्रवासातील सर्वात सुखावह टप्पा होता. 





प्रयाग  म्हणजे  प्र (निरंतर) + याग (यज्ञ ) ज्या  ठिकाणी  निरंतर यज्ञ कार्य चालते. म्हणजेच पुराण काळात या क्षेत्रांचे फार महत्त्व असणार यात शंकाच नाही. भारतात असे चौदा प्रयाग आहेत. प्रत्येक प्रयाग पवित्र नद्यांच्या संगमाशी संबंधित आहेत. त्यापैकी ५ प्रयाग उत्तराखंड मध्येच आहेत.
१) रुद्रप्रयाग – अलकनंदा – मंदाकिनी संगम
२) कर्णप्रयाग – पिंडरगंगा – अलकनंदा संगम
३) देवप्रयाग – अलकनंदा – भागीरथी  संगम
४) नन्दप्रयाग – अलकनंदा – नंदा संगम
५) विष्णुप्रयाग – विष्णुगंगा – अलकनंदा संगम
यापैकी माझ्या प्रवासात मला देवप्रयाग, नंद प्रयाग आणि विष्णुप्रयाग यांचे दर्शन घेता आले. आता मला फारच हुरूप आला होता. मी मनात आकडेमोड केली आणि लक्षात आले की कोणत्याही परिस्थितीत आपल्याला ५ वाजे पर्यंत गौरीकुंडला पोहचलंच पाहिजे. आता कमीत कमी दोन तास तरी सतत गाडी रेटायला हवी या निर्धाराने मी निघालो. तासा भरात मी श्रीनगरला पोहचलो. वाटेत फळांचे रस विकणारी दुकाने दिसली. एवढ्या उन्हात जेवावसं वाटत नव्हतं म्हणून आज फक्त ज्युसच प्यायचा मी ठरविले. एक थंडगार बनाना मिल्क शेक यथेच्छ हाणला आणि पुढच्या रस्त्याला निघालो.  


वाटेत धरी देवीचे मंदिर लागले. त्याचे बाहेरूनच दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला सुरुवात केली.



 अवघ्या एक तासात मी रुद्रप्रयागला पोहचलो. तिथे पुढची चौकशी केल्यानंतर मी केदारनाथच्या दिशेने निघालो. जवळ पास पावणे तीन वाजले होते आणि त्यापुढे फक्त ७२ किमी. नागमोडी रस्त्याचा आता पर्यंतचा प्रवास मी वेळेत पूर्ण करत होतो याचं मनोमन समाधान मिळत होते.आताचा टप्पा प्रवासातील कठीण परंतु आल्हाददायक होता कारण आता मी पर्वतराजी चढायला सुरुवात करीत होतो. 

घाट वळणांचा रस्ता चढत चढत मी हळूहळू अंतर कापत होतो. एव्हाना माझ्या नकळत एक गोष्ट घडली होती. ती म्हणजे माझी आणि माझ्या बाईकची आता चांगलीच गट्टी जमली. आम्हा दोघांना एकमेकांची नाडी योग्यरीत्या सापडली होती. त्यामुळे प्रवास अजूनच सुखकारक वाटत होता. शिवाय उकाड्यातून सुटका देखील झाली.

केदारनाथच्या दिशेने जाणारे प्रत्येक पाऊल सुखकारक होते यात शंकाच नाही. थोड्याच वेळात मी फाटा या ठिकाणी पोहचलो. येथून पुढे गौरीकुंडपर्यंत वेगवेगळी हेलिकॉप्टर्स ऑपेरेटर्सची उड्डाणस्थळे सुरु होतात. आईला केदारनाथला फार वर्षांपासून जायचे आहे पण कामाच्या रगाड्यात तिला ते जमलेच नाही. आता साठी ओलांडल्यानंतर तर ते जवळ पास अशक्यच अशी तिची समजूत बसलेकारणाने तिने त्याचा ध्यास सोडला. आईसाठी म्हणून मी  सहजच चौकशी करण्याकरीता माझी बाईक पवनहंस नामक सरकारी ऑपरेटर्सच्या ऑफिसच्या आवारात घुसविली. बरीच लोकं आगाऊ बुकिंग करून ठेवतात आणि त्यामुळे ऐनवेळेला सीट मिळत नाही याची पूर्व कल्पना मला होती. तिथली माहिती गोळा करून मी गौरीकुंडला निघणार इतक्यात तिथं उभ्या असलेल्या दोन ग्रुपची तारांबळ मला दिसली. गोंधळ न बघता पुढे जाईल तो मुंबईकर कुठला? मी या नियमाला बगल तरी कशी देणार? मी त्या ग्रुपच्या बाजूला जाऊन उभा राहिलो. त्यागोंधळात एक ईश्वरी योजना होती. त्या हेलिकॉप्टर्स ऑपरेटर्सच्या नियमांनुसार फक्त चार प्रवाशी जाणार होते आणि शिवाय त्याला वजनाची मर्यादा होती.  त्यामुळे एक ग्रुप जाऊ शकत नव्हता. मी तिथल्या अधिकाऱ्याला सहज विचारले "क्या प्रॉब्लेम है? इक जगह है क्या?" मौके पे चौका मारावा तसा माझा प्रश्न होता त्या अधिकाऱ्यासाठी. त्या अधिकाऱ्याने माझ्याकडे एक वेळ पाहिले. मला वजन करायला सांगितले. आणि म्हणाला "ठीक है आप पैसा भर दो ।"  मी पुरता गोंधळून गेलो. क्षणाचाही विलंब आणि विचार ना करता मी पैसे भरले बोर्डिंग पास मिळवला आणि पुढच्या बॅच सोबत हेलिपॅडच्या दिशेने निघालो.




माझा विश्वासच बसत नव्हता, उद्याचा अक्खा संपूर्ण दिवस वाचणार होता. मी विचार काय केला होता आणि घडत काय होतं. २००० रोजी बापूंशी माझा परिचय होण्यापूर्वी माझ्या जीवनाचे प्लॅनिंग काहीतरी भलतेच होतं. म्हणजे माझ्यामते, माझ्या कुवतीनुसार आणि मला हवे होते असे. पण जेव्हा मी बापूंशी मैत्री केली त्यानंतर त्याच्या सोबत राहिल्यावर हळू हळू लक्षात आले की ज्या गोष्टींचा मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता अशा सुंदर सुंदर गोष्टी मला अनुभवायला मिळाल्या. जीवनाचे सोनं होणं म्हणजे काय, ह्याचं उत्तम उदाहरण मी आजवर स्वतः अनुभवत आहे. आणि बापूंच्या सानिध्यात आलेल्या प्रत्येकाची कहाणी काही वेगळी नसणार यात शंका अजिबात नको.
आजची हेलिकॉप्टर्स राईड हे त्यातील एक उदाहरण. ह्याचा एकच अर्थ होता की जो एक दिवस वाचणार होता त्यामुळे नुसतं केदारनाथ नाही तर ऋषिकेश आणि हरिद्वार देखील अनुभवायला मिळणार होतं आणि याचा खूप खूप आनंद होत होता. जीवनात पहिल्यांदा मी हेलिकॉप्टर्समध्ये बसत होतो. फारच विलक्षण वाटत होते. लहान बाळाला अलगद कडेवर उचलून घेऊन आई ज्या हळुवारपणे आई निघते अगदी त्याच प्रकारे त्या हेलिकॉप्टर्सने केदारनाथच्या दिशेने उड्डाण घेतले. 


 उंचावरून केदारनाथचा रस्ता दिसत होता. फारच सोप्प वाटत होतं, जेव्हा की अनेक जणांनी केदारनाथविषयीचे आपआपले कटू अनुभवच माझ्या पदरी बांधले होते. पण त्या सर्वांच्या अनुभवाविपरीत माझा अनुभव फारच आल्हाददायक, बिन परिश्रमाचा आणि परमोच्च आनंद देणार ठरत होता. अवघ्या आठ मिनिटात आमचे हेलिकॉप्टर्स केदारनाथच्या हेलिपॅडजवळ उतरले. त्यावेळी तर मला तिथल्या लोकांसोबत फेर धरून नाचावेसे वाटत होते.




मुंबईहून निघून अजून फक्त १७ तासच झाले होते आणि मी केदारनाथच्या समोर उभा होतो. माझ्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. काय करू आणि काय नको असे झाले होते. तेथील सारा आसमंत नजरेने हृदयात स्थिर करण्याचा माझा प्रयत्न चालू झाला. केदारनाथ मंदिरासमोर उभे राहून पहिले असता असे लक्षात येते की मागची शुभ्र बर्फ़ाच्छादित पर्वतराजी जणू प्रभावळच आणि जेव्हा उगवतीच्या सूर्याची कोवळी उन्हे यावर पडतात तेव्हा सोनेरी छटांनी ती प्रभावळ फारच सुंदर दिसते.हवामान खात्याने दिलेल्या धोक्याच्या सूचनेमुळे तिथे जास्त गर्दी नव्हती. जवळपास ८० ते १०० मंडळी तिथे दिसत होती. केदारनाथचे दर्शन घेण्यापूर्वी मी जवळच्या टेकडीवरील भैरवनाथ मंदिराकडे निघालो. केदारनाथ मंदिराच्या उजव्या बाजूने जवळच असलेल्या टेकडीवर भैरवनाथाचे मंदिर आहे. जेमतेम १ किमी. भैरवनाथ केदारनाथ क्षेत्राचे रक्षणकर्ते आहेत अशी भावना आहे. हिवाळ्यात जेव्हा बर्फवृष्टीमुळे केदारनाथ मंदिराचे कपाट बंद होते तेव्हा या क्षेत्राच्या रक्षणाची जबाबदारी भरीवनाथांची असते. म्हणूनच त्यांना क्षेत्रपाल देखील म्हटले जाते. उंचावर असलेल्या या मंदिरातून सर्व परिसर फारच नयनरम्य दिसतो.
तेथील दर्शन घेऊन मी लागलीच खाली उतरलो. केदारनाथाचे दर्शन घेतले. इतक्यात आरतीला सुरुवात झाली. 


एव्हाना रात्रीचे पावणे आठ झाले होते. अचानक वातावरणातील थंडीने आपला जोर वाढविला आणि माझ्या लक्षात आले की  मी अजून राहण्याची काहीच व्यवस्था केलेली नाही. आरती संपल्यानंतर मी दोन-तीन हॉटेल व्यवसायिकांना विचारले असता त्यांनी नकारार्थी माना हलवून माझी पंचाईत केली. २०१६ च्या डिसेंबर महिन्यात मी ओंढा ग्राम स्थित "नागनाथ" या ज्योतिर्लिंगाला भेट दिली होती. सुट्टीच्या काळ आणि फारच कमी हॉटेल्स असल्याने मला ती रात्र एक हॉटेलच्या पार्किंग लॉट मध्ये काढावी लागली होती, त्यावेळची थंडी कशीबशी मी पचविली होती. पण इथे रात्र बाहेर काढली असती तर मात्र माझी काही धडगत नाही यात शंकाच नव्हती. केदारनाथच्या पाठीमागील भागात असलेल्या बर्फाच्छादित डोंगररांगांमुळे सूर्य मावळल्यानंतर तर थंडीचे तांडव सुरु झाले होते. त्यात वाऱ्याचा वेग देखील वाढत होता आणि माझी चिंतादेखील जवळपास बाहेरच रात्र घालवावी लागणार असे वाटत होते.
सगळी चिंता बाजूला सारून मी जेवण करून घ्यायचे ठरविले. चौकशीअंती लक्षात आले कि जवळपास सर्वच धाब्यांवर सारखेच मेनू आहेत. त्या शोधकार्यात एक पुजारी भेटले, त्यांनी मला पूजा करणार का? असा प्रश्न विचारला. मी माझ्या जागेच्या विवंचनेत आणि ते त्यांच्या दक्षिणेच्या. मी विचारले "रहने को जगह मिलेगी ?" कितने आदमी हो ? मैं अकेला हूँ । या संभाषणाअंती मला एक रुम मिळवून देण्यात ते पुजारी यशस्वी झाले. जेवताना ते माझ्या सोबतच होते. इतक्या लांबून येऊन, इतकी मेहनत, खर्च करून तुम्ही इथे येत आणि नुसतेच दर्शन घेता. त्याऐवजी तुम्ही पूजा करा असा तगादा त्यांनी माझ्या पाठीशी लावला होता. त्यावर मी त्यांना म्हटले, पूजा कोणाला करावीशी वाटत नाही, परंतु बऱ्याच ठिकाणी जे अवडंबर चालते आणि पैसे उकळण्याचे धंदे असतात त्याची भीती वाटते अजून काही नाही. त्यावर त्यांनी मला निर्वाणीचे सांगितले का कोणास ठाऊक पण मला असं वाटत आहे की तुम्ही पूजा केलीच पाहिजे, तुम्ही एक काम करा, तुम्ही मला फक्त एकच रुपया द्या दक्षिणेचा आणि पूजेचे साहित्य तुम्ही घ्या. जर तुमच्याकडे एक रुपया नसेल तर जेव्हा तुम्ही मुंबईला पोहचाल तेव्हा माझ्या बँकेतील खात्यात तो एक रुपया जमा करा, पण तुम्ही पूजा केल्याशिवाय जायचे नाही. मी अवाक झालो होतो. अक्षरशः चेकमेट. मी व्याव्हारिकपणे विचारले. सामानाचे किती? त्यावर तुमची इच्छा, १५०/ २५०/ ५०० अशी निरनिराळी साधन सामुग्री आहे. मी त्यांना १५० वाली साधन सामुग्री घेऊन येण्याकरिता सुचविले. त्यावर ते म्हणाले की  ती इथल्या दुकानातुन तुम्ही स्वतःच घ्या. हे सर्व माझ्या डोक्यावरून जात होते. फक्त एक रुपयाचं काय वेड लागलं या पुजाऱ्याला.
सकाळी पाच वाजता मंदिराजवळ भेटू असे ठरले. तसेही मी लवकर उठून पुन्हा दर्शनासाठी मंदिरात जाणारच होतो त्यात झालंच तर पूजाही  होईल. पण  हा काही एक रुपयासाठी उद्या येणार नाही ही  माझी पक्की खात्री करून मी झोपी गेलो.  सकाळी लवकरच चार वाजता उठून सर्व तयारी करून मी हॉटेलच्या बाहेर पडलो आणि मंदिराजवळ आलो. कालचे पुजारी आपल्या विशिष्ट पोशाखात माझी वाटच बघत होते. मी पूजन सामुग्री घेतली आणि
त्यांच्यासोबत मंदिरात प्रवेश केला. केदारनाथ ज्योतिर्लिंगाभोवती पूजेसाठी आलेल्या भाविकांची तोबा गर्दी  होती. त्या पुजाऱ्यांनी अत्यंत कसोशीने मला जयंतिर्लिंगासमोर बसण्याकरीता जागा मिळवून दिली. काय सांगू तुम्हाला आजू बाजूच्या गर्दीची तम ना बाळगता तब्ब्ल १५ मिनिटं निवांतपणे  पंचोपचार पूजा केली. त्या पुजाऱ्यांनी मंत्रोच्चाराला सुरुवात केली  त्या मंत्रोच्चारात लिंगाला पाणी, दूध, तूप, मध आणि चंदन लेपण्याचा अनुभव भारी होता. तदनंतर जानवं ,बिल्वपत्र, फुले वाहिली. पूजे दरम्यान अनेकदा लिंगाला मस्तकाचा स्पर्श केला. एकदम जबरदस्त अनुभव होता तो. त्या दरम्यान कोणीच मला माझ्या जागेवरून लवकर उठा किंवा पूजा आटपा वगैरे व्यत्यय आणला नाही. सर्वच काहीतरी विलक्षण होतं ते.
पूजेनंतर मी समाधानानं मंदिराबाहेर पडलो. आनंदाने मी त्या पुजाऱ्याच्या हातात पाचशे एक रुपये ठेवले. हॉटेलवर येऊन सर्व आवरले. चहा आणि बिस्किटं खाऊन मी बरोबर ६ वाजता मी हेलिकॉप्टरच्या बेसपाशी पोहचलो.
आता माझ्यापुढे पुढचा प्रश्न होता तो म्हणजे खाली कसे जायचे. जर मी ट्रेक करून खाली गेलो तर  कमीत कमी ५ ते सहा तास लागणार म्हणजे जवळपास दुपारी १२ ते १ च्य दरम्यान मी गौरीकुंडाजवळ पोहचणार. तिथून पुढे फाटा येथील पवनहंस या हेलिकॉप्टर्सच्या ऑफिस आवरात ठेवलेली बाईक घेऊन रुद्रप्रयागला जाऊन रात्र घालवायची की पुन्हा हेलिकॉप्टर्सने थेट पवनहंसचे ऑफिस गाठायचे आणि विनासायास पुढे २०० किमी वर असलेल्या बद्रीनाथचे दर्शन घ्यायचे. सरासरी विचार करता मी दुसरा पर्याय निवडायचे ठरविले. पण तेथील कुठल्याच हेलिकॉप्टर्स ऑपरेटर मला सकारात्मक भूमिकेत दिसत नव्हता. कारण एकच उतरताना अनेक भक्त अनेक कारणांपोटी हेलिकॉप्टर्सचा पर्याय निवडतात. आणि अशावेळी माझ्यासारख्या आगंतुक आणि ऐनवेळी हजर होणाऱ्या प्रवाशाची गणती थिजगणतीतच होते.

त्याचवेळी कालचे तीन प्रवासी पावनहंसच्या ऑफिसमध्ये दाखल झाले. पुन्हा पहिले पाढे पंधरा. तोच वजनाचा घोळ आणि मग त्यांनीच गळ घातली की मला देखील त्यांच्यासोबत घेण्यात यावे. पुन्हा एकदा माझा नंबर लागला.  परंतु तुम्हाला कळकळीची विनंती आहे की शक्य असल्यास तुम्ही आगाऊ बुकिंग करून जा आणि त्यात येण्या जाण्याचे केले तर अति उत्तम. आमचा नंबर येईपर्यंत जवळपास सकाळचे ७.१५ वाजले. ८ च्या आसपास मी पुन्हा सज्ज होऊन बद्रीनाथच्या दिशेने निघालो. २०० किमी चा टप्पा आणि बराच वेळ हाताशी असले कारणाने मी वाटेत लागणारे चोपटा, तुंगनाथ या ठिकाणी जाण्याचे देखील ठरविले.

पुढच्या लेखात तुंगनाथ, बद्रीनाथ आणि माना गाव (Last Indian Village) बद्दल  माहिती आणि अनुभव.......

No comments:

Post a Comment