Monday 15 February 2016

मुंबई ते रोहतांग- भाग दुसरा - दिवस पहिला - ९/०८/२०१३

मी झोपेत अजून रायीडला जाऊ कि नको हाच  विचार करत होतो, इतक्यात मला हळुवार हाक ऐकू येते. "ओंकार, साडे तीन वाजले",  १० वीच्या परीक्षेच्या वेळी आई रोज उठवायची आठवण मला झाली.एरव्ही सकाळी  ८ वाजे पर्यंत मी कुंभकर्णाची भूमिका सहज पार पाडली, पण मनावर असलेल्या दडपणामुळे माझ्या पापण्या अलगद उघडले, हॉलं मधील अंधुक लाईट मध्ये मला वर्षा किचनच्या दिशेने जाताना दिसत आहे.  मी जागेवर उठून स्वस्थ बसून नित्य जप म्हणतो आणि बापू, नंदाआई व दादा यांच्या फोटोकढे बघत बसलो. आत्तापासून पुढील ९ दिवस, वर्षा, आंजनेय (६ वर्ष) आणि  अर्जुन (२ महिने) घरी एकटेच राहणार या भीतीने मन कातरल होत.शिवाय मी एकटा रायीड करणार, यापूर्वी  मी जास्तीत जास्त ३ दिवस रायीड केली होती. ती देखील मुंबई ते रत्नागिरी, माझ्या गावी, म्हणजे ओळखीचा रस्ता, ओळखीची लोकं, सारे काही आपले. पण आता मी पहिल्यांदाच बाइक वरून महाराष्ट्राबाहेर जाणार ते देखील ९ दिवस. नको नको ते विचार अगदी चित्रांसहित डोळ्या समोरून स्टेशन वरून निघून जाणाऱ्या लोकल ट्रेन प्रमाणे भरभर जात होते. इतक्यात  बापूंचा, नंदाआईचा आणि दादांचा हसरा चेहरा मला पुन्हा वर्तमानात घेऊन येतो, त्यांच्या छत्र छायेत, क्षणभर मीही हसलो आणि लगेचच निश्चिंत झालो. 

वर्षाची किचन मधली धावपळ चालूच होती. ती प्रचंड तणावात असलेली मला जाणवले पण तिच्या हालचालीतून ती तितकीच खंबीरही जाणवत होती, "ओंकार, साडे तीन वाजले" यावाक्यानंतर तिने एकही शब्द माझ्याशी बोलली नव्हती. मला तिची घालमेल माहित असूनही मीही तिच्याशी न बोलण्याचा विचार केला व आपले प्रात: विधी उरकून तयार झालो. कारण जर तीचा बांध फुटला तर माझी रायीड रद्द.

मी घरातून निघताना तिला माझा एक फोटो काढण्यास सांगितला तोही तिच्या मोबाईल मध्ये, आणि बाईसाहेबांचे डोळे पाणावले. झाला बट्ट्याबोळ, पण आता मन उंबरठ्याबाहेर होते, मी तिला प्रेमाने आलिंगन दिले आणि माझ्या बाइकच्या (वॉरहॉर्स) दिशेने कूच केली. 

Saturday 6 February 2016

मुंबई ते रोहतांग- भाग पहिला-बाइकवरच बिऱ्हाड- Turning Point

माझा मोठा मुलगा आंजनेय, हा चार वर्षाचा असताना त्याला आम्ही यशवंत नाट्य- सभागृह येथील एका नाट्य-शिबिराला घातले होते. एप्रिल-२०११ रोजीचा महिना होता. एरवी वर्षा त्याला घेऊन अंधेरी ते माटुंगा ये-जा करत होती. एका शनिवारी,काही कारणानिमित्ताने  तिने मला जबाबदारी सोपवली. एक तास कसा घालवायचा या विवंचनेत माझी पाऊले शिवाजी मंदिराच्या दिशेने निघाली. मी तेथील ग्रंथालयात वेळ घालवावा  ठरविले . पुस्तके घेण्यात जितका मी पटाईत आहे, तितकाच ती न वाचता रद्दीत देण्यात देखील माझा हात कोणीच धरू शकत नाही. मी नेहमी प्रमाणे पुस्तक चाळायला सुरवात केली आणि अचानक माझ्या हातात एक पुस्तक आले  "बाइकवरच बिऱ्हाड" (पुणे ते  लेह  ते श्रीनगर / एका कलंदराचा  प्रवास).  मी ते पुस्तक चाळत असताना इतका बेभान झालो  कि मला उशिर झाला हे वर्षाचा फोन आल्यावर कळले. मी आंजनेयला घेऊन कधी एकदा घर गाठतोय आणि पुस्तक वाचतो असे मला झाले. आयुष्यात पहिल्यांदा मी अवघ्या चार तासात  एक पुस्तक वाचून संपवले होते.  त्यातील डॉक्टर अजित हरिसिंघानी यांची जबरदस्त सफर वाचून मला लेह पर्यंत बाईकने जाता येते याची प्रथम कल्पना मिळाली. त्यानंतरच्या दोन वर्षात अनेकदा मी ते पुस्तक वाचून काढले.