Thursday 23 March 2017

ज्योतिर्लिंग बाईक राईड २०१५

बराच वेळ उलटून गेला तरी रॊमी काही आला नव्हता. डिसेंबर महिन्यात पहाटे सायन हायवेवरून भरधाव जाणाऱ्या वाहनांची लगबग बघून जीव अजून अधीर होत होता. २०१५ चा नाताळ शुक्रवारी आल्याने नाताळ बाबाने आम्हा ऑफिसवर्गाला शनिवार- रविवार जोड सुट्टीची चांगलीच भेट दिली होती. मग अशात एक राईड तर नक्कीच व्हायला पाहिजे. मग मी, रॊमी आणि निखिल असे तिघेच महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगे करण्यासाठी निघालो. भल्या पहाटे थंडीत एखाद्याची वाट बघणे म्हणजे काय वैताग असतो त्यात उशीर होत असेल तर विचारायची सोय नाही. इतक्यात रॊमी आला त्याच्यावर शिव्यांचा भडीमार करणार इतक्यात त्याने बाईकवरून  उतरून मिठी मारली. "सॉरी यार" यात सगळं प्रकरण थंडावलं होत. पण माझे समाधान म्हणून शिव्यांची लाखोली वाहिलीच. त्याच्या बाईकचा एक्स्ट्रा फ्लड लाईट वाटेत पडला. तो कसा बसा अडकवून तो तिथपर्यंत पोहचला होता. मग जवळच्या रसशीने मी तो बऱ्यापैकी आवळला. इतक्या पहाटे गॅरेज मिळणार नाही म्हणून पुण्यात जाऊन बघू असे ठरवून आम्ही दोघेही पुण्याच्या दिशेने भरधाव निघालो. आम्हाला वाजता पुण्यात पोहचायचे होते पण सहा वाजता आम्ही वाशी टोलनाका क्रॉस करीत होतो. निखिल पुण्याला भेटणार होता, उशीर झाल्याचे त्याला तसे कळविले

मुंबई- लोणावळा वॉरहॉर्सच्या अगदी परिचयाचा रस्ता, अतिशयोक्ती करयाची झाली तर तो स्वतःच या रस्त्यावर अगदी भरधाव धावतो. कुठेही फालतू टाइम पास करता आम्ही लोणावळ्यात पोहचलो. आता लोणावळा आला आणि अन्नपूर्णा मधील नाश्ता नाही केला तर पापच असल्याच्या आविर्भावात, मी आणि रॊमी डायरेकट् अन्नपूर्णाच्या पार्किंग लॉट मध्ये अवतरलो. यथेच्छ नाश्ता करून पुण्याच्या दिशेने झेपावलो. अवघ्या चार तासात आम्ही पुण्याअलीकडे ठरल्या ठिकाणी निखिलला भेटलो. एव्हाना १० वाजले होते. तळेगावच्या वर्दळीतून मार्ग काढत आमच्या तिघांच्या बाईक्स भीमाशंकरच्या दिशेने कूच करीत होत्या.भीमाशंकर कडे जाण्याचा रस्ता अतिशय विलोभनीय आहे.





पावसात तर या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे निसर्गप्रेमींसाठी सुखाची पर्वणीच म्हणावी लागेल. आजचा दिवस आम्ही भीमाशंकरचे दर्शन घेऊन रात्रीपर्यंत औरंगाबाद ला पोहचायचा प्लॅन केला होता. जवळपास च्या आसपास आम्ही  भीमाशंकर मंदिराजवळ पोहचलो

नाताळच्या जोडून आलेल्या सुट्टयांमुळे सहाजिकच मंदिरात दर्शनासाठी भली मोठी रांग होती. भीमाशंकरचे दर्शन करून रात्रीपर्यंत औरंगाबाद गाठायचे होते. पण रांगेची व्याप्ती बघून प्लॅनला तडा नक्कीच जाणार होता. मग आम्ही तिघे बुचकळ्यात पडायच्या आधीच ठरिवले श्रद्धा आहे पण मग सबुरीचे काय? रांगेत उभे राहायचं नक्की केले मग कितीही वाजू देत. तब्ब्ल चार तासांनी आम्ही दर्शन'घेऊन गाडीच्या दिशेने निघालो. 






मग जवळच्याच टपरीवजा हॉटेलात जे मिळालं ते निमूटपणे पोटात ढकलून, औरंगाबादच्या दिशेने मार्गस्थ झालो. तीर्थ यात्रा म्हणजे नक्की काय याचा अनुभव मला येत होता. इथं यात्रेत तुमच्याकडे अमाप पैसे खिशात असून सुद्धा कामी येत नाही, कामी येते ती फक्त तुमची जाणीव. जाणीव ही कि परमात्मा माझ्यावर खूप खूप प्रेम करतो. मग जीवनयात्रा ती वेगळी काय? जीवनयात्रा आनंदाने जगायची असेल तर मग वरील जाणीव लक्षात ठेवायची. एकदम सोप्प होऊन जातं सगळं.

संध्याकाळचे चार वाजले होते आणि औरंगाबादसाठी जवळपास २९० किमी अंतर तुडवायचे होते. कितीही घाई केली तरी रस्त्याचा अंदाज घेता किमान आठ तास लागणार होते. मग आज रात्री अहमदनगर गाठायचे ठरविले. नारायणगाव- आळेफाटा- सावरगाव-धोकेश्वर मार्गे सुमारे दहाच्या सुमारास आम्ही अहमदनगरला पोहचलो. कडाक्याच्या थंडीने अक्षरशः कुडकुडणे या शब्दाची खरी अनुभूती मिळत होते. अहमदनगरच्या थंडीने कुडकुडणे म्हणजे हाडांचा थरकाप. एका गार्डन रेस्टोरंटमध्ये जेवताना बाजूला शेगडी लावली जेणेकरून निखाऱयांची धग मिळली. आत्तापर्यंत निखाऱ्यावर फक्त कणसं आणि तंदुरीचे प्रकार हेच पाहिले होते पण हे काही अजबच होते. सुरवातीला मला वाटलं की गरम गरम रोटी तिथल्या तिथे बनवून देणार की काय? पण ती शेगडी आमच्यासाठी लावली होती. मुंबईच्या आम्हाला इतकी थंडी म्हणजे जरा कटू अनुभवच म्हणावा लागेल.



 एका हॉटेलवाल्याशी हुज्जत घालून कशीबशी एक रूम ११०० रुपयात मिळवली. जवळपास १च्या आसपास तिघांचेही घोरण्याचे सूर एकमेकांत अलगद मिसळून गेले असावेत. "मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा " या गाण्याचा स्पीड जसा वाढत जातो तशाच प्रकारे अगदी थोड्याच वेळात सगळ्या रूम भर आमचे सूर घुमू लागले असतील. मी घोरतो हे मला माझ्या अर्धांगींनीने बहुतेकवेळा सांगितले आहे आणि निखिल आणि रोमीचे सूर मी त्यारात्री ऐकले होते म्हणून यात शंका नसावी

दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता उठून लगबगीने आंघोळ उरकून साडे पाचच्या सुमारास आम्ही औरंगाबादच्या दिशेने आप आपले वारू उधळले. 





त्या थंडीत ६०च्या स्पीडने गाडी चालविताना वारा अक्षरशः सर्वांग सुन्न करू पाहात होता. सुदैवाने उत्तम रायडींग सामग्री असल्याने (Riding Gears) कसबसं आम्ही त्या थंडीला थोपवू शकत होतो. 


जवळपास ८च्या आसपास घृष्णेश्वर मंदिराजवळ येऊन थबकलो. पुन्हा रांग आमची वाट पाहात होतीच.             

पुन्हा


जवळपास अडीच एक तास रांगेत काढल्यावर जबरदस्त दर्शनाचा अनुभव सगळं क्षीण घालवत होता.


आज रात्री आम्हाला औंढा नागनाथचे दर्शन घेऊन मग पुढे परळी वैजनाथ येथे पोहचायचे होतेसुमारे ३२५ किमी च्या आसपासचे अंतरपरत दर्शन रांगेचे गणितजुळविले तर लक्षात आले की जवळपास १४ तास तरी जाणार आणि ते शक्य नव्हतेकारण एकच. महाराष्ट्रातील या भागातून रात्रीचा प्रवास म्हणजे दरोडेखोरांची भीतीमाहीत असून उगाचचे धाडस करणे म्हणजे मूर्खपणा आणि तो आम्ही तिघांनीही धुडकावून लावला होतामग जालना,  जिंतूर मार्गे औंढाला पोहचायचे ठरलेशाळेतअसताना भूगोलात वाचलेली शहरे बाईकवरून बघताना एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळत होताराईडमुळे ही शहरे नुसती पाहावयाला नव्हे तर अनुभवायलाही मिळतहोतीकारण जागोजागी तुम्हाला रस्ता विचारावा लागतोमग अनुशंघाने तेथील लोकसंपर्क ही आलामातीचा गुण हा तिथे वावरणाऱ्या लोकांना लागतो हे फार खरं आहेभाषाशैली तर मैला मैलाला बदलतेम्हणजे भाषा मराठीच पण वक्तृत्त्वशैली इतकी निराळी की मराठी भाषेचा अपभृंश पावलोपावली जाणवतो.

देव तारी त्याला कोण मारी:
संध्याकाळचे सात वाजून गेले होते आणि आम्ही जिंतूरच्या चौकात येऊन पोहचलो.  चहाची तलप आल्याने आम्ही तिघेही एका टपरीपाशी उभारलो आणिचहाची ऑर्डर दिलीतिखट खमंग चिवडा आणि चहाचे घोट रिचवित आम्ही तिघेही संतुष्ट झालोफक्त ४५ किमी चा टप्पा बाकी राहिला होताम्हणजे जास्तीत जास्त १तासथंडीचे दिवस असल्याने सर्वत्र अंधार पसरला होतात्यात मी निखिल आणि रोमी यांना पुढे जाण्यास सांगितले कारण दोघांनाही अंधारात गाडी चालवायला त्रासहोत होता आणि त्यामुळे ते हळूहळू जात होते आणि मला हळूहळू गाडी चालवून कंटाळा आला होतारात्रीच्या रायडींच्या बाबतीत जरा मी दोघांच्या तुलनेत उजवाच ठरलोहोतोमग मागाहून जवळपास पंधरा मिनिटाच्या अंतरावर मीदेखील निघालो.

औंढा नागनाथ ला जाण्यासाठी नांदेड रोडने जावे लागतेमी मुद्दामून गाडी ६० च्या स्पीडवर ठेवली जेणेकरून मी निखिल आणि रोमीला अर्ध्या रस्त्यात गाठू शकेनपंधरा मिनिटे होऊन गेलीत तरी रस्त्यात निखिल आणि रोमी काही केल्या दिसेनात म्हणून मग मी गाडीचा स्पीड ७०च्या आसपास आणलादहा मिनिटे झाली तरी तेदोघे काही दिसेनात बरं कुठे चुकामुक व्हावी तर रस्त्याला वळणे किंवा फाटेदेखील नाहीतम्हणजे अगदी सरळ रस्तामग हे दोघे नक्की कुठल्या दिशने गेलेतमनातशंकांचे काहूर उठू लागले त्यात सोबतीला किर्रर्र अंधार आणि थंडीने पाने सुकून गेलेली झाडे रस्त्याच्या दुतर्फा अगदी ओघाओघाने भीषणतेची जाणीव करून देत होती.
हळूहळू माझ्या लक्षात आले की आतावर सोबत असलेली वाहतुकीची आणि माणसांची वर्दळ क्षणात नाहीशी झाली होती.  वातावरणात एक वेगळीच स्मशान शांततापसरली होतीअंधाऱ्या रस्त्यात दूरवर पसरलेला माझ्या बाईकचा लाईट जेवढा रस्ता दाखवत होता तेवढंच विश्व् नजरेच्या टप्प्यात शिवाय दुतर्फा सुकलेली झाडे त्यांच्याविचित्र आकाराने माझ्या मनात भीतीचे सावट पसरवू पाहत होती. याचा अर्थ ते दोघे नाही तर मीच आडवळणाला लागलो होतो. आतापर्यंत भारतात अनेक ठिकाणी मी एकट्याने बाईकवरून प्रवास केला होता. माझ्या मनात विचार येत होता की हा चकवा तर नसावा. आता पर्यंत चकवा या बद्दल ऐकून होतो पण कधी अनुभव आला नव्हता. पण चकवा लागल्यास मनुष्य एकाच जागी पुन्हा पुन्हा घोळत राहतो परंतु इथेतर रस्ता दूरवर कुठेतरी निघून जात होता. आणि हो तो औंढा नागनाथ च्या दिशेने तर नक्कीच जात नव्हता कारण गेली जवळपास अर्धा तास होऊन गेली तरी अजून एखादी वस्ती किंवा रस्त्याचा एखादा बोर्ड पण दृष्टीक्षेपात आला नव्हता.

त्या निरव शांततेत असलेली विलक्षण भयानता आता अगदीच प्रखर वाटू लागली होती, नको नको ते भास होऊ लागले. क्षणात मला असं वाटू लागलं नक्कीच कुणीतरी माझ्या बाइकच्या पाठच्या सीटवरच बसलं आहे आणि पूर्ण बाइकचा ताबा त्याच्याकडे असून  एका कटपुटली प्रमाणे मी त्याच्या आदेशानुसार गाडी चालवत आहे. त्या वाईट शक्तीची ताकत फारच जास्त असावी कदाचित, कारण माझ्यापरीनं घाबरण्याचा माझा केविलवाणा प्रयत्न पुरता फसला होता. मला कळून चुकलं होतं की याचा शेवट नक्कीच चांगला नसणार. हळूहळू माझ्या जाणिवा शिथिल होऊ लागल्याचा मला भास होऊ लागला कारण मुखी चालू असलेला जप माझ्या कानावर पडत नव्हता. या  गोष्टी दुसऱयांकडून ऐकल्या होत्या पण स्वतः अनुभवताना काय पंचाईत होते ती मी अनुभवत होतो.

तेव्हाच माझे जीवन मार्गदर्शक गुरु डॉ अनिरुद्ध जोशी यांची तीव्रतेने आठवण झाली आणि मनोमन त्यांनी अंगी बाणविलेला आत्मविश्वास अक्षरशः उफाळून आला. परमात्मा माझ्यावर खूप खूप प्रेम करतो या त्यांनी मनावर ठसविलेल्या वाक्याची आठवण झाली आणि माझ्या परमात्म्याला मी मनापासून साद घातली. इतक्यातच मागून लक्ख प्रकाश दिसला. मी गाडीच्या काचेत पाहिले असता दोन वर्तुळाकार लाईट माझ्या दिशेने येताना दिसले. रोमी आणि निखिलच्या गाड्यांचे लाईट पाहून मला हायसे वाटले. फारच वेगाने ते दोघे माझ्या दिशेने येत होते.त्यांच्या गाड्या माझ्या अगदी जवळ आल्या म्हणून मी माझी गाडी थांबविली. तेव्हा मला लक्षात आले की ती एक चार चाकी गाडी होती. त्यातील माणसाने गाडी थांबवून मला विचारले की औंढा नागनाथचा रस्ता हाच का? मी आपसूकच मान हलविली. गाडी पुढे निघाली. आणि गाडीच्या मागच्या काचेवर लिहलं होते, "जय मल्हार" आणि "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे".  मला देवाचा इशारा कळून चुकला होता यावेळी देव पाठीशी नाही तर माझ्या पुढे होता त्या संकटात माझ्यासाठी धावून आला होता. मीही त्या गाडी मागोमाग पुढे निघालो. अवघ्या २० मिनिटात मी त्या गाडीपाठोपाठ ओंढा नागनाथ मंदिरापाशी पोहचलो. ती गाडी तशीच भरधाव वेगाने पुढे निघून गेली.

इतक्यात माझ्या खिशातील फोन वाजला, निखिलचा होता, त्याच्याशी बोलल्यावर लक्षात आले की ते दोघे रस्त्यातच माझी वाट बघत उभे आहेत. तासाभराच्या अंतराने आम्ही तिघे पुन्हा एकत्र भेटलोघडला प्रकार मी त्या दोघांनाही सांगितला. सरळ रस्त्यावर पुढे गेलेल्या या दोघांना मी दिसलो कसा नाही. शिवाय बुलेटचा आवाज दुर्लक्षित करणे ही अशक्य बाब. अशा अनेक प्रश्नांवर आम्ही अनुत्त्तरीतच होतो. नक्कीच काहीतरी विचित्र प्रकार होता. पण देवकृपेने काही अमंगल घडले नाही.

ओंढा नागनाथ तसं अविकसित खेडेगाव म्हणायला हरकत नाही. ज्योतिर्लिंग यात्रेमुळे येणारी गर्दी इतकीच काय ती या गावाची जगातील इतर लोकांशी असलेली ओळख म्हटली तर वावगे ठरणार नाही. परीणामी राहण्यासाठी हॉटेल फारच मोजकी. जोडून आलेल्या सुट्टयांमुळे इथली तुरळक हॉटेलं तुडुंब भरलेली होती. मग काय एका हॉटेलच्या पार्किंग लॉट मध्ये आम्ही आपल्या गाड्या आणि स्वतःला पार्क केले. हो बरोबर वाचलंत त्या रात्री आम्ही पार्किंग मध्येच झोपलो. हॉटेलच्या वॊचमनने एक सतरंजी आणून दिली. ती पसरून आम्ही तिघे त्या थंडीत उघड्यावरच झोपलो. अंगावरचे रायडींग जॅकेट काढता तसेच झोपी गेलोतीन चार तासाच्या झोपेच्या प्रयत्नात पहाटेचे चार वाजले. त्या कडाकाच्या थंडीत थंड पाण्याने आंघोळ करताना लहानपणीची एक आठवण झाली. पहाटेच्या संधीप्रकाशात इमारतीच्या गच्चीवरील टाकीत जाणाऱ्या पाइपवर बसलेल्या कावळ्यांची आंघोळ. कावळ्याची आंघोळ हा शब्द प्रयोग आमच्या त्या आंघोळीला तंतोतंत लागू पडला होता. वॊचमनच्या हातात एक शंभर रुपये दिले. त्या सतरंजीची किंमत लाख मोलाची होती पण व्यवहार आडवा आला होता.

पहाटेच पाचच्या सुमारासच आम्ही दर्शन घेतले अगदी निवांतपणे. भल्यापहाटे ते सुद्धा थंडीच्या सीजनमध्ये चहाचा आस्वाद घेणे यासारखे सुख नाही. सोबतीला सर्वत्र सहज उपलब्ध असणारा पारले-जी चा गोड हसणारा मुलगा भारतात कोठंही आपल्या मदतीला धावून येतो आणि गरज असलेलं ग्लुकोज देऊ करतो. चहा आणि पारले-जी चा फन्ना उडवून आम्ही परळीच्या दिशेने निघालो. मॉर्निंग ग्लोरी काय धमाल असते आणि विशेषतः बाईक सफर करताना तर ती विशेष खुलते.

परभणी- गंगाखेड मार्गे आम्ही परळीला पोहचलो. रांगेचे बिगुल इथे मात्र शांत झालेले होते. सहज सोप्या आणि रमणीय ठिकाणी पर्यटकांचा राबता असतो म्हणून भीमाशंकर आणि घृष्णेश्वर येथील गर्दी आम्हाला औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ येथे सुदैवानं नाही मिळाली. दर्शन घेऊन मग आंबेजोगाई मार्गे आधी अहमदनगर आणि मग पुण्याला रात्री दहा पर्यंत पोहचलो. निखिल पुण्याला राहत असल्याने आता पुढचा मुंबई पर्यंतचा प्रवास मी आणि रोमीच करणार होतो. जवळपास अडीच वाजे पर्यंत पोहचतो असे मी वर्षाला सांगितले. नेहमी प्रमाणे राईडवरून आल्या आल्या गरमागरम कडी भात करून ठेवण्यासाठीची आगाऊ सूचना मी दिली होती. सकाळी सहा वाजल्यापासून जवळपास ५०० किमीचा प्रवास करण्यासाठी आम्ही जवळपास १३-१४ तास राईड करीत होतो. नाही म्हटलं तरी थकवा होताच.

पुण्यात पोहचे पर्यंन्त रोमी दोनदा वाटेत थांबला होता. डोळ्यांवर झापड येत असल्याने, शिवाय रात्री समोरून येणाऱ्या गाड्यांच्या लाईटने तो फारच त्रस्त झाला होता. पण काही केल्या आम्हाला उद्या कामावर पोहचायचे होते. राईड करताना कामाशी कोणतीच प्रतारणा मी अद्याप केलेली नाही आणि या तत्त्वावर ठाम राहण्यासाठी मी नेहमीच परमेश्वराकडे साकडे घालीत असतो. परंतु निखिलने पुण्यात त्याच्या घरी राहण्याचा ठिय्याच मांडला. आज रात्रीचा मुक्कामपोस्ट निखिल म्हैन्द्रकरांचे निवासस्थान पण एका अटीवर उद्या सकाळी पहाटे लवकर निघून नॉन स्टॉप मुंबई.


दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजताच आम्ही निखिलचं घर सोडलं. सकाळच्या वेळेत लोणावळ्याला पोहचेपर्यंत आम्ही दोघेही मडक्यातल्या कुल्फीप्रमाणे गार झालो होतो. लोणावळ्यात चहा घेताच थंडीचे आवरण गळून पडलं होते. कात टाकलेल्या सापाप्रमाणे मी आणि रोमी मुंबईच्या दिशेने सुटलो. एव्हाना ऊनाने थंडीची चादरीची घडी घालून तिला बाजूला केलं होतं. आमच्या गाडयांनी चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला होता. मजल दरमजल करीत अवघ्या एका तासात आम्ही वाशी टोलनाका गाठला होता. ठीक आठच्या सुमारास आम्ही वाशी ब्रिज ओलांडत होतो. वेळेत पोह्चल्याचा आनंद आम्हा दोघांच्याही चेहऱ्यावर दिसत होता.

परमेशवराच्या कृपेने सकाळी दहा वाजता ऑफिसात अलगद लॅपटॉप चालू करताना मी विचार करीत होतो की एका तासापूर्वीचा माझा पेहराव हा रायडींग गेयर्सनी सुस्सज रायडरचा होता आणि आता टिपिकल ऑफिस अटायर मध्ये. एकाच व्यक्तीची भिन्न परंतु सकारात्मक क्षमता/ कलागुण  त्याच्या सामर्थ्याची जाणीव करून देतात. माझे जीवनमार्गदर्शक डॉ अनिरुद्ध नेहमीच आम्हाला verstile personality चे महत्त्व सोदाहरण समजवून सांगतात. त्यांच्या अंगी असलेल्या अनेक क्षमता/ कलागुण मी जेव्हा जेव्हा बारकाईने अभ्यासण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तेव्हा माणूस म्हणून मी स्वतःची किती प्रगती करू शकतो यावर विश्वासच बसत नाही. बऱ्याच वेळेला लोकं मला प्रश्न विचारतात की तू ऑफिस आणि रायडींग हे कसं मॅनेज करतो, खरं सांगू, अगदी मनापासून सांगतो, पावलोपावली डॉ अनिरुद्धांचे मिळणारे अमूल्य मार्गदर्शन मला जीवनात अनेक गोष्टींचा सुवर्णमध्य गाठण्यास फार मदत करते.