Saturday 23 April 2016

मुंबई ते रोहतांग शेवटचा टप्पा दिवस सहावा, सातवा,आठवा आणि नववा (१४/०८/२०१३, १५/०८/२०१३,१६/०८/२०१३ आणि १७/०८/२०१३)

१४/०८/२०१३: शिमला ते मनाली

सकाळी सूर्य उजाडण्यापूर्वीच मी सामानाची बांधाबांध करून ठेवली होती. वॉरहॉर्स सर्व सामानाने सुसज्ज करून सकाळी ठीक ७ वाजता शिमला सोडले. 
तत्पूर्वी पेट्रोल भरून घेतले जेणेकरून मधल्या रस्त्यात उगाचच वेळ वाया जायला नको. नुकतेच उजाडले असल्याने रस्त्यावर फारच तुरळक वर्दळ दिसत होती. पावसामुळे वातावरण भलतेच आल्हाददायक वाटत होते. हिरवेगार गालिचे अंगावर घेऊन भले मोठे डोंगर दूरदूर पसरलेले दिसत होते. त्या घनदाट रस्त्यातून गाडी चालवायचे सुख काही औरच. 
 लोंकानी उगाच मला घाबरवून सोडले होते. माझ्या जीवनातला सुंदर प्रवास मी करत असल्याची जाणीव मला त्या दिवशी होत होती. मला लवकरच घागस पर्यंत पोहचणे भाग होते कारण शिमला ते मनाली ह्या दोन हिल स्टेशन पर्यंत पोहचण्यासाठी सखल भागातील शहरी वस्तीतून जावे लागते व मला तेथील गर्दी, ट्राफिक  इत्यादी गोष्टी कटाक्षाने टाळायच्या होत्या.




 सकाळी १०.३० च्या सुमारास मी घागस गाठले होते. घाटवळणांच्या रस्त्यातून जवळपास १०० किमी येण्यास मला तीन तास लागले होते. त्यापुढे मग सुंदरनगर, नेरचौक ही गावं पार करून मंडी पर्यंत पोहचलो. 


 मंडीपासून मात्र पुढचा प्रवास हा पुन्हा आल्हाददायक कारण आता मनालीपर्यंतचा पूर्ण रस्ता व्यास नदी (BEAS) आपल्या सोबत असते. ह्या नदीचे खोरे फारच विशाल आणि खोल आहे. 




एका वळणावर माझा स्पीड मी एकदम कमी केला व चालू गाडीवरच मी फुटरेस्ट वर उभा होऊन सभोवताल पाहत पुढे सरकत होतो.  १९७७ साली बांधण्यात आलेला  "पंडोह डेम" अगदी दिमाखात "हायड्रोइलेक्ट्रिक उर्जा निर्मिती" चा मानाचा बोर्ड दिमाखात मिरवत उभा होता. येथे फोटो काढण्यास सक्त मनाई असल्याने मला येथे वाटत असूनसुद्धा फोटो काढणे शक्य नव्हते.

अत्यंत सुंदर असा प्रवास व सोबत व्यास नदीचा खळाळता आवाज मंत्र मुग्ध करीत होता. जस जसे मनालीचे अंतर कमी होत होते तस तशी वातावरणात थंडी जाणवायला सुरवात झाली. सोबत मनीकरण येथे निघालेले शीख तरुण मात्र वातावरणाची कोणतीच तमा न बाळगता बिनधास्त पणे आपल्या बाइक चालवत होते. आपल्या तीर्थक्षेत्री पोहचण्याची त्यांची जबर इच्छा सर्व परीस्थितींवर मात करण्यास पुरेशी होती. एका ठिकाणी त्या समूहाबरोबर गप्पा मारताना हे लक्षात आले कि एकट्याने रायीड करताना मी कधीच एकटा नसतो. बिनधास्त कोणाशीही बोलायचे. कसली भीती? कदाचित एकट्याने रायीड करताना तुम्ही आपसूक बिनधास्त वागू लागता आणि  हीच खरी गम्मत असते.  

























सुमारे पाचच्या आसपास मी मनाली चेकपोस्ट पाशी थबकलो. तिथे गाडीचे परमिट घ्यावे लागते. परमिट फॉर्म भरताना बाजूला असलेल्या एका रायडरने स्मित हास्य करून "सुमंतो" अशी स्वतःची ओळख करून दिली. पंचेचाळीसीच्या आसपास असलेला व वास्तूविशारद म्हणून अबू दाबी येथे वास्तव्य करणारा सुमंतो खास लदाख रायीड साठी भारतात आला होता. तो दिल्लीहून निघाला होता. जेव्हा मी त्याला माझी ओळख करून दिली तेव्हा त्याने मला त्यासोबत लदाख पर्यंत येण्यास सुचविले. परंतु सुट्टी अपुरी असल्याने मी त्याला नकार दिला. पुढे आम्ही एकत्र रोहतांग पास पर्यंत जाऊ असे ठरवून एका हॉटेल मध्ये रूम बुक केले. 

संध्याकाळी मनाली फिरून मी हॉटेलवर परतलो व सुमंतोशी उद्या सकाळी सहा वाजता निघण्याचे ठरवून झोपी गेलो.


१५/०८/२०१३: रोहतांगपास एक गुपित
सकाळीच आम्ही ठरल्याप्रमाणे हॉटेल सोडले. त्यावेळी हॉटेल मालकाने मला विचारले "साब रूम रखू या फिर छोड दू". मनाली ते रोहतांग ५२ किमी जाउन येउन जास्तीत जास्त ३ तास मग कशाला लागतोय रूम. सकाळी १० वाजेपर्यंत पुन्हा मनालीला येउन सरळ पुढे दिल्ली गाठीन असे मी त्याला सांगितले. यावर तो फक्त हसला आणि म्हणाला "साब मै रूम रखता हुं भले ही आप अभी चेक आउट कर लिजिये".  आम्ही रोहतांगच्या दिशेने निघालो.  






जबरदस्त वातावरण जीवनातल्या बऱ्याच गोष्टी मी पहिल्यांदा पाहत होतो. पांढरी शुभ्र नदी. कुठेतरी दूरवर डोंगरात घट्ट होऊन बसलेला बर्फाचा ग्लेशियर. माझा विश्वासच बसत नव्हता की मी मुंबई ते रोहतांग पर्यंतचा प्रवासातला कमालीचा आनंद आणि यशाची अनुभूती देणारा क्षण अनुभवत होतो. अशावेळेला शब्दात तो व्यक्त करणे फारच कठीण होऊन बसत. 








रोहतांगपास  अगदी २ किमी वर असताना एक टर्न येतो, पावसामुळे नेमका तिथे चिखल जमतो शिवाय समोरून येणाऱ्या गाड्यांनी आणखी कोंडी होते. सुमंतो माझ्या पुढेच होता आणि नेमका त्या टर्नला त्याची बाइक थोडीशी घसरली पर्यायने मागोमाग मलादेखील ब्रेक मारणे अपरिहार्य ठरले आणि चिखलावर ब्रेक मारल्याने वॉरहॉर्स देखील घसरला. पायाचा आधार द्यायला गेलो तर त्यात पाय देखील घसरला. पुढे सुमंतो आणि मागे मी पत्त्यांचा बंगला कोसळावा अगदी त्याप्रमाणे धारातीर्थी. वॉरहॉर्स सामानाने लादलेला असल्याने त्या उतारावरील चिखलात मला काही केल्या तो उठवेना. मागून येणाऱ्या गाडीतून लागलीच लोकल माणसे येउन मला मदत केली. पुन्हा पूर्ववत होऊन आम्ही दोघे रोहतांग पास पाशी पोहचलो.




सुमंतो पुढे निघाला व मी माघारी, पावसाने हजेरी लावली असल्याने थंडी कमालीची वाढली होती. आधीच १३००० फुटावर असल्याने ऑक्सिजन येथे विरळ त्यात पाउस आणि थंडी याने वातावरणात सर्वत्र धुके पसरले. पावसामुळे मी पूर्ण ओलाचिंब झालो होतो. साध्या रेनकोटचा तिथे काहीही उपयोग नव्हता, शिवाय रोहतांग येणे हे मुळच्या प्लान मध्ये नसल्याने मी तशी काहीच तय्यारी केली नव्हती. हेल्मेट फुल फेस नव्हते त्यामुळे थंड वारे अगदी मुक्तपणे चेहऱ्यावरून डोक्यापर्यंत जाउन मेंदूला सुन्न करत होते. माझ्या डोक्याच्या कवटीचा परीघ किती आहे हे त्यावेळी थंडीमुळे मला जाणवत होते. ती मुळात थंडी नव्हतीच कुणीतरी धारदार सुरीने अंगावर वार करावे अशी काहीशी परिस्थिती होती. थोड्याच वेळात मला लक्षात आले की आत्तापर्यंत ज्याला मी धुक समजत होतो ती नेमकी भोवळ येण्याची अवस्था होती. साधे लोकरीचे हातमोजे पावसात भिजून बोट अजून थंड करीत होते. ते  काढून बाइक चालवणे तर फार कठीण होत होते कारण वारा फारच बोचरा होता. सकाळी हॉटेलवाला का हसत होता व त्याने माझा रूम अजून एका दिवसासाठी का ठेवला होता याचे गुपित मला त्यावेळी उलघडले. डोळ्यासमोर दोन चिमुकली मुले आणि एक प्रेमळ पत्नी सारखे दिसू लागले होते. माझी अवस्था अगदी रडवेली झाली होती. मला सर्व असह्य्य होऊन बसले होते. धड वॉर-होर्स चालविता येत नव्हता व त्या परिस्थितीत तिथे थांबताही येत नव्हते. शेवटी देवाचा धावा करून सर्व जिद्द पणाला लावून ठरविले की अजून आपली वेळ आलेली नाही, आणि हो मी वर्षाला वचन दिले आहे की मी सुखरूप घरी परत येणार. मी घट्ट डोळे मिटून माझ्या आराध्य दैवताचा धावा केला. रोहतांग पास उतरताना कधी मी त्याच हॉटेल पाशी पोहचतो आहे असे मला झाले होते. संध्याकाळी जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा मला कळले की मी हॉटेलच्या बेडवर आडवा होतो. हॉटेलवर मी कसा आलो, माझे सामान कोणी उतरविले, रूम कोणी उघडला, घडला प्रकार मला बिलकुल जाणून घ्यायची इच्छा नव्हती.

सहा वाजून गेले होते. संध्याकाळी मनालीच्या बाजारपेठेतून घरातल्यांसाठी भरपूर खरेदी करून व मनालीतील सुप्रसिद्ध रेस्टोरनट "जोन्सन" मध्ये जाउन व्यास नदीतील प्रसिद्ध "ट्रोउट" फिश आणि भात हाणला.  मनालीला येणे सार्थक झाल्याच्या आविर्भावात मी हॉटेलवर परतलो.

१६/०८/२०१३: मनाली ते दिल्ली
आत्ता पुढचा प्रवास मनाली ते दिल्ली सुमारे ५५० किमी चा प्रवास मी एका दिवसात पार केला, कारण एकच सुट्टी संपत आली होती. व मला ठरल्याप्रमाणे ट्रेन पकडायची होती. रात्री मी दिल्लीला पोहचून हॉटेल गाठले व आराम केला.






१७/०८/२०१३:
दिल्ली रेल्वे स्टेशनला जाउन वॉरहॉर्सला सुद्धा मी जात असलेल्या ट्रेनमधूनच  "लगेज" म्हणून नेण्याची व्यवस्था पार पाडली. दिल्ली रेल्वे स्टेशनवर आम्ही दोघे एकाच ट्रेनची वाट बघत होतो. किती अजब वाटत होते मागचे आठ दिवस आम्ही एकमेकांना चालवत घरापासून दूरवर आलो होतो व आज दिल्ली प्लाटफोर्मवर घरी परत जाण्यासाठी कुणाची तरी वाट बघत बसलो होतो. ५८ वर्षानंतर, कामावर यशस्वीरीत्या जबाबदारी पार पाडून रिटायर झालेल्या व्यक्तीच्या भावना काय असू शकतात हे मी अनुभवत होतो, तो  म्हणजे "निवांतपणा".  पण हो पुढच्या वर्षी लदाख नक्की.



मी मुंबईला परतल्यावर दोन महिन्यानंतर, माझा प्रिय मित्र अमित चटर्जी याने तर मला, माझ्या जीवनातील एक खूप मोठे गिफ्ट दिले. ती म्हणजे त्याने माझ्यावर एक छोटीशी फिल्म बनविली व आमच्या सर्व मित्रांसमोर अचानकपणे सादर केली.