Saturday 4 August 2018

"जेथे जातो तेथे तू माझा सांगाती" (ज्योतिर्लिंग यात्रा २०१८) भाग: १


देहरादूनच्या जॉली ग्रॅण्टच्या एअरपोर्टवर अनाउंसमेंट झाली, मुंबईला जाणारे विमान एक तास उशिराने उडेल. मग काय तिथल्या वेटिंग लॉबीमध्ये बसल्या जागीच स्थिर झालो. पण मग मनाचे काय ते कुठं स्थिर बसणार होते. आपसूक मागील एक महिन्यात झालेल्या घडामोडींच्या उजळणीला सुरुवात झाली. कधीही न होणारी माझी केदारनाथ बाईक यात्रा संपूर्ण झाली शिवाय नुसतंच केदारनाथ नाही तर, तुंगनाथ, बद्रीनाथ, माना गाव, सरस्वती नदी, व्यास गुफा, अनेक महत्त्वाचे प्रयाग, हरिद्वार, ऋषिकेश, गंगा इतकी सगळी क्षेत्र आणि चोपटा, जोशी मठ सारखी प्रेक्षणीय स्थळं फक्त पाच दिवसात कशी काय मी पूर्ण करू शकलो यावर अनेकजणांचा आजही विश्वास बसत नाही. मुंबई- उत्तराखंड- मुंबई आणि वर नमूद केलेल्या सर्व पवित्र क्षेत्र केवळ पाच दिवस? कसं काय केलंस रे बाबा? तुझे पाय कुठे आहेत रे बाबा ? तुला घरच्यांची पर्वा नाही काय रे ? घरचेतरी कसे पाठवतात रे तुला ? त्यांची पण कमाल आहे रे ? अनेक जणांचे अनेक प्रश्न. कुणाचे काळजी पोटी, तर कुणाचे कुतूहलापोटी, कुणाचे मत्सरापोटी तर कुणाचे कुचक्यास्वभावापोटी .......

पण खरंच सांगू मित्रानों, माझे एकच सूत्र ...... ।।एक विश्वास असावा पुरता कर्ता, हर्ता गुरु ऐसा ।। 
माझे सद्गुरू, माझे मित्र, माझे बापू म्हणजेच आमचे लाडके डॉ अनिरुद्ध धैर्यधर जोशी,


केवळ त्यांनी दिलेल्या सामर्थ्याच्या बळावर आजवर बाईकने भारतभर प्रवास केला तो देखील रेकॉर्ड टाइममध्ये. मी करत असलेल्या बाईक राईड यशस्वी होण्यामागे फक्त आणि फक्त त्यांचाच हात आहे. सुंदरकांडाचे एक वाक्य मी माझ्या मनावर कायम कोरले आहे "सो सब तव प्रताप रघुराई नाथ न कछु मोरी प्रभुताई " . माझ्या लेखात या आधी आणि या पुढे जर कुठेही माझा अहं येत असेल तर तो बापूंच्या चरणी विलीन व्हावा ही एकच अपेक्षा.

वॉरहॉर्सवर आरूढ होण्याअगोदर स्वतःला आणि त्याला चांगल्या प्रकारे उदी लावतो. अगदी टायर, केबल्स , बॅटरी,आरसे, इंजिन , इंडिकेटर्स , लाईट, चैन काही काही म्हणून सोडत नाही, त्रिपुरारी चिन्हाचे आणि  त्रिविक्रमाचे लॉकेट स्वतःला आणि वॉरहॉर्सला देखील. आणि मग काय दोघेही गडी तय्यार एका नव्या कामगिरीसाठी. 

बुलेटची किक म्हणजे बंद पडलेल्या हृदयाला देखील कंपने आणते, निदान जुन्या बुलेटच्या बाबतीत तरी ते अगदी खरं आहे. माझी तरी जुनीच आहे म्हणजे उलट्या बाजूला गिअर्स असणारी. जुन्या बुलेट बाळगणारे ज्या आवेशात किक मारतात त्याची गंमत भारी असते.


ज्याप्रमाणे आपल्या लाडक्या राजाच्या  नावाचा जयघोष करताना शंखनाद, तुतारीचे दीर्घ स्वर, नगाऱ्यांचा नादध्वनी संपूर्ण नसानसांतून रक्ताचा प्रवाह उसळवतो अगदी तशीच अवस्था माझी होते जेव्हा मी किक मारताना बापूंच्या नावाचा जयघोष करतो. आणि त्याच आवेशात एखाद्या योध्याप्रमाणें मग मी माझी बाईक राईडची कामगिरी पार पाडतो.       


आजवर कन्याकुमारी ते काश्मीर खोऱ्यातील उंच सखल भागातून बाईकने प्रवास करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणविली, प्रवासात कधी कार्पेट घातल्यासारखे मोठं मोठे नॅशनल हायवे व त्यातील मोठमोठया वाहनांच्या धोकादायक वेगवान हालचाली सामोऱ्या येतात, कधी वाळवंटी प्रदेशातून दूर-दूर पर्यंत एक चिटपाखरू देखील न दिसणारा वैराण रस्ता, कधी किर्रर्र जंगलातून जाणारा भयावह रस्ता, तर कधी बर्फ़ाच्छादित प्रदेशातून जाणारा, थंडीने मेंदूच्या पार ठिकऱ्या उडविणारा रस्ता, कधी कधी अचानक मोठयाला प्रवाहाने वाहून गेलेला रस्ता, तर कधी कधी अर्धा रस्ताच नाही अशात आपले उचित ध्येय नजरेसमोर दिसतं पण मार्गच दिसत नाही मग पुढं जाणार कसं? या उलट मनाला सुखावणाऱ्या निसर्गरम्य प्रदेशातून जाणारा सुंदर, सुव्यवस्थित रस्ता देखील अनुभवयाला मिळला. हे सर्व जीवनापेक्षा वेगळं असू शकेल का? गेली पाच वर्षे करत असलेल्या बाईक प्रवासात एक मोलाची गोष्ट मला कळली ती म्हणजे नित्य जाणीव "तो सदैव माझ्यासोबत होता,आहे आणि असणार." आणि आपसूक मन, बुद्धी आणि देह एका अभंगात गढून जातं ....

                     जेथे जातो तेथे तू माझा सांगाती ।
                       चालविसी हाती धरूनिया ।।१।।
                    चालो वाटे आम्ही तुझाचि आधार ।
                      चालविसी भार सवे माझा ।।२।।
                    बोलो जातां बरळ करिसी ते नीट ।
                     नेली लाज धीट केलों देवा ।।३।।
                     अवघे जन मज झाले लोकपाळ ।
                        सोईरे सकळ प्राणसखे ।।४।।
                    तुका म्हणे आतां  खेळतों कौतुके ।
                      जालें तुझें सुख अंतर्बाही ।।५।।

बाईकवर असताना ही जाणीव आम्हा तिघांना ही आहे. तिघे म्हणजे मी, वॉरहॉर्स आणि माझी पत्नी वर्षा आणि म्हणूनच आम्ही तिघेही नेहमीच निश्चिन्त असतो. 

उत्तराखण्ड बाईकने पालथा घालण्याचे वारे जवळपास दोन तीन वर्षे माझ्या डोक्यात घुमत होते. कारण ही तसेच खास. केदारनाथ. यापूर्वी नऊ जोतिर्लिंगाचे दर्शन घ्यायचे भाग्य माझ्या पदरी पडले. त्यातील ८ जोतिर्लिंग मी आणि माझी बुलेट (वॉरहॉर्स) दोघांनी एकत्र केलीत. मी माझ्या बाईक राईडचे सूत्रच बदलून टाकले. दरवर्षी निदान एकतरी जोतिर्लिंग बाईकने पूर्ण करायचे. आणि २०१८ हे वर्ष मी केदारनाथ चे दर्शन घेण्याचे ठरविले. यावेळी सोबत माझा मित्र अमित चॅटर्जी देखील तयार झाला. ऑफिसमधील कामाचा आवाका लक्षात घेता, मुंबईहून केदारनाथला बाईकने पोहचणे शक्य नव्हते. म्हणून आम्ही हरिद्वार पर्यंत ट्रेन आणि मग पुढे बाईकने प्रवास असा निश्चय केला. यावेळी आम्ही आमच्या बाईक न घेता ऋषिकेश येथून भाड्याने बाईक घेणार होतो. तशी सगळी माहिती देखील गोळा केली.

ठरल्याप्रमाणे ९ दिवसाचा कार्यक्रम आम्ही आखला. त्या अनुशंघाने येण्या जाण्याच्या प्रवासाचे तिकीट देखील आम्ही बुक केले. परंतु त्यात अमितने आणि अप्रत्यक्षरीत्या त्याच्या घरच्या मंडळींनी एक अट टाकली ती म्हणजे या राईड मध्ये केदारनाथ नाही करायचे. आता माझी कोंडी झाली मला कोणत्याही परिस्थितीत केदारनाथ करायचे होते आणि अमितला कोणत्याही परिस्थितीत ते करायचे नव्हते. मनोमन मी माघार घेतली आणि काळजावर दगड ठेवून, अमितच्या हिशोबाने नुसतं प्रेक्षणीय स्थळं फिरण्याचा मानस नक्की केला. आमच्या प्रवासाचा महिना उजाडला. जून . जूनच्या १५ तारखेला आम्ही निघणार होतो आणि २४ जूनला परतीचा प्रवास होता. दिवस एका मागोमाग उलटू लागले. दरवेळी प्रमाणे यावेळी माझी उत्कंठा शिगेला पोहचु इच्छित नव्हती कारण मी केदारनाथला जाणार नव्हतो.  
  
अशातच ९ जूनला सकाळी सहा वाजता दारावरची कडी वाजली . सुट्टीच्या दिवशी इतक्या सकाळी म्हणजे नक्कीच काहीतरी महत्त्वाचे असणार. मी त्वरेने दार उघडले तर समोर आमच्या माळ्यावरचे, ८२ वर्षांचे कोल्हटकर काका. मी विचारायच्या आधीच ते गंभीर आवाजात म्हणाले, अत्रे काका गेलेत. मी लागलीच अत्रे काकांच्या घरात पोहचलो. एकलुत्या एक मुलीचे लग्न झाल्यानंतर, अत्रे दांपत्य एकटेच राहत होते. दोघेही नुकतेच साठी पार करून आरामात आयुष्य जगत होते. ३५ वर्षांपूर्वी दोघांचा प्रेमविवाह झालेला. दोघांचे एकमेकांवर अतिशय प्रेम. घरात त्यावेळेला अत्रे काका शांत पणे बेडवर झोपलेल्या अवस्थेत तर त्यांच्या शेजारी अत्रे काकु बसल्या होत्या त्यांना मी हाक मारताच त्यांनी मला घट्ट मिठी मारली आणि धाय मोकलून रडू लागल्या. आमच्याच इमारतीत मी याच अत्रे काकूंसमोर लहानाचा मोठा झालो, अनेक हाल अपेष्टांचे ओझे वाहताना आजवर मी त्यांना पाहिले होते. पण रडताना मी त्यांना गेल्या ३५ वर्षात पहिल्यांदा पाहत होतो. मी काकूंना धीर दिला. दुपारपर्यंत आम्ही इमारतीतील सर्वजण अत्रे काकांना घेऊन स्मशान भूमीत पोहचलो. अत्रे काकांच्या घरच्या लोकांनी सोपस्कार करण्यास सुरुवात केली आणि मी तेथून बाहेर पडून तिथल्याच एका बागेत जाऊन शांत पणे अत्रे काकांसोबत बालपणापासून घालविलेल्या गोष्टींना उजाळा देत बसलो. काकांसोबत घालविलेले अनेक क्षण मला बेचैन करू लागले. काकांचा मिश्किल स्वभाव वारंवार नजरेसमोर तरळू लागला. त्या सर्व गोष्टींनी बेजार होऊन मी आभाळाकडे बघितले आणि माझी नजर पडली तो त्या बागेतील कारंज्यावर विराजमान शिवाच्या मूर्तीवर. अर्धोन्मीलित नजरेची ती धान्यस्थ मूर्ती किती शांत, स्थिर आणि स्थितप्रज्ञ भासत होती. क्षणात मनातल काहूर शांत झालं आणि अगदी त्या क्षणाला मनातून एक आवाज आला. "केदारनाथला जायचं म्हणजे जायचं".

मी ठरविले, सोमवारी ऑफिसमध्ये पोहचल्या पोहचल्या अमितला सांगणार "मी केदारनाथला जाणार म्हणजे जाणार". सोमवारी कामाच्या रगाड्यात मी ती गोष्ट विसरून गेलो. आमचा प्रवास त्या आठवड्यातच सुरु होणार होता. आता त्यात  सोमवार देखील गेला, म्हणजे फक्त ३ दिवस अगोदर प्लॅन चेंज झाल्याचे अमितला कळवायचे प्रश्नचिन्ह माझ्यापुढे होते. मी देवालाच साकडं घातल "बाबा रे तूच काय तो मार्ग दाखव " दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला माझ्या डेस्कवर पोहचण्याआधीच अमित तिथं माझी वाट पाहत बसला होता. मी काही बोलायच्या आतच तो बोलू लागला. "अरे भाई तुझे कुछ पत्ता है की नही? उत्तराखंड मे क्लाउड बर्स्ट हुआ है, बहुत प्रॉब्लम चालू है, अपने को कॅन्सल करना पडेगा । " मी मनातल्या मनात भगवंताचे आभार मानले. सुंठेवाचून खोकला गेला. मला काहीच बोलावे लागले नाही. आता मी फक्त केदारनाथ करण्याच्या हेतूने मनात प्लॅन करू लागलो. त्याने त्याचे जाण्या येण्याचे तिकीट रद्द केले आणि मी फक्त जाण्याचे रद्द करून १५ तारखे ऐवजी २० तारखेचे तिकीट बुक केले.

एकूण प्रवासाचे दिवस ९ वरून ५ वर आलेत. त्यात २० तारखेला ह्रिषीकेश ला पोहचून बाईक भाड्याने घेणे, मग पुढे गौरीकुंड पर्यंत प्रवास करून त्या रात्री तिथेच मुक्काम करायचा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी १४ किमी चा केदारनाथ ट्रेक करायचा केदारनाथचे दर्शन घ्यायचे आणि तिथेच मुक्काम करायचा. तिसऱ्या दिवशी पुन्हा १४ किमी चा प्रवास करायचा आणि गौरीकुंडला मुक्काम करायचा. चौथ्या दिवशी ह्रिषीकेशला पोहचायचे आणि पाचव्या दिवशी देहरादून एयरपोर्टवरून मुंबई साठी विमान. असा पाच दिवसाचा सुटसुटीत कार्यक्रम आखला. यात आकस्मिक आपत्कालीन घडामोडींसाठी पर्यायी दिवसाची काहीच तरतूद नव्हती. विषेशतः उत्तराखंडमध्ये आपत्कालीन गोष्टी काही नवीन नाहीत.

पुढच्या भागात मी नेमक्या प्रवासाला आणि त्यात आलेले अनुभव आपल्यासमोर मांडीन ......

STAY TUNED.........

2 comments:

  1. Kya baat....
    Hats off to your spirit Onkar sir... Enjoyed reading about the journey... Keep it up and keep all of us inspiring and motivating ... 🙏🙏

    ReplyDelete
  2. Thank you so much shivanand

    ReplyDelete