११/०८/२०१३: दिल्ली सहल:
आजचा दिवस नक्कीच माझा होता. दोन दिवसात
दिल्ली गाठल्याने माझा आत्मविश्वास फेसाळणाऱ्या धबधब्याप्रमाणे ओसंडून वाहत होता. का
कोणास ठाऊक दोन दिवसाच्या सलग १७ ते १८ तास बाइक चालवण्याचा थकवा मला अजिबात जाणवत
नव्हता. ऑफिस कामानिमित्त दिल्लीला येणे व बुलेटवरून दिल्लीला येणे यात जमीन आसमानाचे
अंतर होते.
सकाळीच चांदनी चौकातली पराठे वाली
गली गाठली. चांदनी चौकातले मार्केट उघडायला तसा बराच वेळ असल्यामुळे दुकानात गर्दी
कमी होती. दुपारपर्यंतच्या आहाराची तजवीज
करूनच मी चांदनी चौकातून निघालो. मनाची अवस्था एखाद्या टीव्ही प्रमाणे झाली होती, आपल्याला
हवे ते चेनेल हवे ते प्रोग्राम. लहान मुलाला टीव्ही रिमोट मिळावा व आवडीचा प्रोग्राम,
पाहिजे तेवढा वेळ बघायला मिळाल्यावर जसा आनंद होतो तशी अवस्था माझी झालेली होती. दिवसभर
दिल्ली हिंडून सर्व प्रकारच्या स्पेशालिटी खाद्य प्रकारांचा मनोसोक्त आस्वाद घ्यायचा
मी बेत मुंबईलाच बनवलेला होता.
पुढे बुलेट ची राजधानी म्हणून ओळखल्या
जाणाऱ्या करोल बागला जायचे मी ठरवितो. करोल बाग म्हणजे ऑटो पार्टस चे होलसेल मार्केट.
येथे जुन्या नव्या दुचाकी भाज्यांप्रमाणे विकतात.
तेथील एका दुकानाचे मालक सरदारजी होते त्यांनी मला रायडींगच्या बऱ्याच गोष्टी समजावून सांगितल्या.
सरदारजींना पुन्हा उद्या मुंबईला परत निघणार असे सांगितल्यावर त्यांनी आश्चर्याने
मला विचारले, "अरे इतने दूर हायवे नाल गड्डी चलासी… पुत्तर तूसी सिमला-मनाली हो आओ"…… बस्स दिल
खुश हो जायेगा" अगदी वर्मावर घाव घातला सरदारजींनी. मी आणि वर्षा लग्नानंतर फिरायला
जाणार होतो शिमला-मनालीला आणि अचानक येऊ घातलेल्या वर्षाच्या डिप्लोमा परीक्षेने घात
केला होता. त्यावेळी शिमला-मनालीच्या एवजी गोव्याला गेलो होतो.मी हतबल नजरेने ते शक्य नाही असे सरदारजींना
न बोलताच मी काढता पाय घेतला.
शिमला मनाली ला जाऊ कि नको या विचारात
असतानाच खिशात वाजत असलेला फोन मी थोडासा रागानेच न बघता उचलला. रविवारी दुपारी मार्केटींगचे बरेच कॉल येतात म्हणून तार स्वरामध्ये रेकूनच "हेलो" बोललो तर समोरून वर्षाचा आवाज . मी तिला शिमला मनाली बद्दल विचारले असता अतिशय सहजतेने तिने “पण फक्त शिमलाच, मनाली
नाही”
असे मंजुरीवजा आदेश दिला.
कोणत्यातरी अचानक येऊ घातलेल्या युद्धकामगिरीवर निघालेल्या योध्याप्रमाणे माझी व आपल्या मालकावर नितांत प्रेम करणाऱ्या घोड्यासारखी वॉरहॉर्सची अवस्था होती. लागलीच मी पुढच्या तय्यारीला लागलो. करोल बागच्या मार्केट मधून आवश्यक सामानाची जमवाजमव मी केली.मग काय खाद्य भ्रमंती बाजूला सारून लागलीच लडाख केरियर, नवीन टायर (पुढचा) आणि नाईट विजनसाठी क्लियर ग्लासचा एक गॉगल घेतला.मी बेहद खुश होतो. अचानक घेतलेल्या निर्णयामुळे थोडीशी धावपळ उडाली होती पण ती मला मान्य होती. सकाळी लवकर उठण्याच्या हेतूने मी कुठेही फालतू वेळ न घालविता हॉटेल गाठले.
१२/०८/२०१३: दिल्ली ते शिमला
मी घेतलेला निर्णय मनाला फारच सुखावणारा होता. सकाळी मोबाईल मध्ये लावलेल्या अलार्म अगोदरच मला जाग आली होती. कदाचित शिमलाला जाण्यास मी जास्तच उतावीळ होतो. हॉटेल मध्ये देखील काही लोक शिमला येथे जाण्यास निघालेली होती. त्यांना घेऊन जाणाऱ्या काही गाड्या हॉटेल बाहेर रांगेत उभ्या होत्या व त्यांचे ड्रायवर आपापसात त्यांच्या टूरचे प्लानिंग करत होते. रोज सामान बांधायची असलेली माझी कसरत चालूच होती. मी मुंबईहून शिमलाला चाललो आहे यात त्यांना काहीच रस नव्हता कारण "रात्री आपण कुठे भेटून मदिरापान कुठे करणार?" ह्यावर त्यांचं अजून एकमत झालेले नव्हते, त्यांच्या गप्पांवर माझे बारीक लक्ष होते कारण त्यांच्यापैकी एकाला मला शिमला चा route विचारायचा होता. प्रवासात तुम्हाला नेमके कळले पाहिजे कि कोण तुम्हाला योग्य मार्ग दाखवू शकतो व हि कला अनुभवानेच येते. त्यापैकी एका ड्रायवरला शिमला पर्यंतचा route map विचारून मी दिल्ली सोडतो.
कालच बसवून घेतलेल्या लडाख करियर ने वॉरहॉर्स खऱ्या अर्थाने युद्धाच्या मोहिमेवर निघाल्यासारखा भासत होता. मी देखील कॅमोफ्लेज विजार घालून त्याला शोभून दिसण्याचा प्रयत्न केला.
सोमवार सकाळी कामावर निघालेली अनेक मंडळी हाताने "All the best" करून " जा सिमरन जी ले अपनी जिंदगी"
या अविर्भावात मला प्रोत्साहन देत होती व माझा आनंद अजून द्विगुणीत करु पाहत होती. आपण जगू पाहत असलेल्या जीवनाचा प्रतिनिधी म्हणून कदाचित त्यांनी मला नेमले असावे व मला त्यांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत ह्या अविर्भावात मी "Grand Trunk
Road" ला लागलो.
"Grand Trunk
Road" हा आशिया खंडातील सर्वात जुना व लांब पल्ल्याचा रस्ता. पूर्व हिंदुस्थानच्या दक्षिण-पूर्वभागातील प्रदेशांना उत्तर-पश्चिमेकडील प्रदेशांना जोडण्यासाठी "मौर्य" राजवटीत बांधला गेला होता. तक्षशीला (आत्ताचे पाकिस्तान) याला पाटलीपुत्र ( पटना) याच्याशी जोडण्यासाठी चंद्रगुप्त मौर्याने आपल्या कालखंडात याचा विकास घडवून आणला होता. अंदाजे २६०० किमी चा रस्ता त्यावेळीचे तक्षशीला, हस्तिनापुर, प्रयाग, पाटलीपुत्र यांना जोडणारा एकमेव रस्ता होता. पुढे शेर शाह सुरी यांनी ह्या मार्गाची पुनर्बांधणी केली व हाच रस्ता अफगानिस्तान पासून बांगलदेश पर्यंत विस्तारित केला.
नंतर ब्रिटीश राजवटीत या मार्गाचे नामकरण "Grand Trunk
Road". परकियांच्या आक्रमणात दडपलेला हिंदु सुवर्ण-इतिहास मला हतबल करून सोडत होता. मन एकदम विषण्ण होऊन बसलेले असतानाच वॉर-हॉर्स मला एका हलक्या झटक्याने गाडीत पेट्रोल भरायची वेळ आली असल्याची जाणीव देऊन पुन्हा वर्तमानात घेऊन येतो. पेट्रोल भरून मी पुन्हा हायवेला लागतो.
येथून पुढचा प्रवास अत्यंत सुखदायक. आणि मग काय " मै जिंदगीका साथ निभाता चला गया , हर फिक्र को धुए मे उडाता चला गया.…… "अम्रितसरी कुलचे, फोटो यासाठीची मधलीसुट्टी घेत मी शिमलात दाखल होतो.
माझ्या डोक्यात शिमला म्हणजे आतापर्यंत पाहिलेल्या जुन्या हिंदी पिक्चरमधील माल रोडवरील रिड्ज चर्च समोर हिरो, हिरोइन यांना त्यांच्या परिवारासोबत अचानक भेटण्याचे एकमेव स्थान हेच होते, पण मला माल रोड, रिड्ज चर्च किंवा हिरो, हिरोइन व त्यांच्या परिवारापैकी कोणीच दिसत नाही. गेला एक तास मी नुसता भटकतच होतो. मग एकाला विचारल्यावर कळले कि माल रोड वर गाडी नेण्यास मनाई आहे. मालरोड खेरीज शिमलाच्या अवती भोवतीने अनेक हॉटेल्सचे पर्याय आहेत. एव्हाना माझ्या मनातील विचारांचा गोंधळ, रानफुलांप्रमाणे सर्वत्र पसरलेल्या काश्मिरी हॉटेल्स दलालांनी ओळखलेला होता, व ते माझ्या मागे लागलेतसुद्धा, त्यातील एकाने तर धाडस करून, लोकलमध्ये सीट पकडावी त्याप्रमाणे माझ्या गाडीवर मागच्या सीटवर चढून बसला सुद्धा. तो काही केल्या उतरायला तय्यार होईना, हे पाहिल्यावर मात्र मी गाडी थांबवून चांगलीच करडी नजर दिल्यावर तो ओशाळला व न बोलताच निघून गेला. वॉर-हॉर्स व्यवस्थित पार्क करता येईल अशा हॉटेल मध्ये रूम घेऊन मी वेळ फुकट न घालवायचा विचार केला आणि माल रोडच्या दिशेने निघातो. एव्हाना ७ वाजलेले असल्याने वातावरण भलतेच जबरदस्त भासत होते. समोर रिड्ज चर्चची रोषणाई नजर खिळवून ठेवणारी होती. पहिल्यांदाच आल्याने मी काय काय बघू असे झाले. थोडासा वेळ घालविल्यावर आता एकच अजेंडा " जेवण, जेवण, जेवण, जेवण". काहीतरी स्पेशल खाउन तृप्त व्हायचे असेल तर "गुप्ताजी वैष्णव धाबा" हा शिमला मधील अनेक पर्यायांपैकी एक.
१३/०८/२०१३: शिमला सहल:
आज फक्त शिमला हुंदडायचे होते, सकाळी केलेल्या दोन पराठांच्या न्याहारीवर मी दुपारपर्यंत तग धरून होतो, याचे कारण एकच पावसानंतरच्या खुललेल्या नैसर्गिक भागातून जाताना कुणाचीही भूख-तहान हरपून जाते, एरव्ही भूख सहन न होणारा मी रायीड्वर असताना मात्र फारच वेगळा वागत होतो, यात मोठा वाटा होता तो निसर्गाचा.
कूफ्री, फागू नारकंडा हि ठिकाणे पाहून परतताना एका सुंदर हॉटेल पाशी मी थबकतो.जीवनात पहिल्यांदा झाडावरचे सफरचंद खाण्याचा योग मला त्यादिवशी मिळाला. टुरीस्टदृष्टीकोनाने ऑगस्ट महिना हा कमकुवतच म्हणावा व म्हणूनच कदाचित हॉटेल मालकाने माझे एवढे लाड पुरवावे कि, स्वतःच्या बागेतील सफरचंदे खायला घातली. झाडावर असलेली सफरचंदे मी पहिल्यांदाच पाहत होतो व त्यात ती खायला मिळाल्याने शिमला सफर खऱ्याअर्थाने फलद्रूप झाली म्हणणे खोटे ठरणार नव्हते.
दिवसभर भटकून मी हॉटेलवर परतलो, "साब अब मनाली जाओगे क्या"? असा आत्मविश्वासाने ओतप्रोत भरलेला सवाल, हॉटेलच्या रीसेप्शनीस्ट ने माझ्या समोर टाकला. शिमला मनाली हि एक कॉमन टूर आहे व त्याने टाकलेला सवाल हा देखील कॉमनच. त्याने टाकलेल्या प्रश्नांमध्ये मला माझे उत्तर मिळाले, पुन्हा कधी यायला मिळेल, आलो आहोत तर करूया मनाली. (त्यापुढील २ वर्षात मनालीला मी तीन वेळा जाऊन आलो ती वेगळी गोष्ट). परत "फोन अ फ्रेंड" वर्षाची पुन्हा एकदा परवानगी मिळाली.
आता उद्या मनाली. शिमला ते मनालीचा रस्ता फक्त २५० किमी चा परंतु घाट-वळणांचा. शीमलातील अनेकजणांनी बाईकवरून जाण्यासाठी मला घाबरवून सोडले होते. जाणकार व्यक्तीचा सल्ला घेण्याच्या दृष्टीने मी शिमलातील सुप्रसिद्ध अशा लव्नेश मोटर्स ला भेट दिली. त्यांच्या मालकाशी बोलल्यावर मला योग्य ती माहिती मिळाली. त्यांच्याकडे वॉरहॉर्सची योग्यप्रकारे पडताळणी करूनच पुढच्या प्रवासासाठी मी निर्धास्त झालो.
Well good going. Keep it up.
ReplyDeleteAwaiting for the next part.
Thanks Bro.
DeleteOmkar simply great exeperince riding to most beautiful place in world.
ReplyDeleteThanks Abhi.
DeleteOmkar simply great exeperince riding to most beautiful place in world.
ReplyDeleteAmazing riding experience. Thanks for sharing Onkar. Nice information on Road history.Waiting for next post
ReplyDeleteNice ... Beautiful ... Journey from Mumbai to Rohtang...
ReplyDelete