Sunday, 13 March 2016

मुंबई ते रोहतांग- भाग तिसरा - दिवस दुसरा - १०/०८/२०१३

एव्हाना मी पूर्णतः वॉरहॉर्सच्या अधीन झालो होतो, परंतु कुटुंबाशिवाय पर्यटनात मला बिलकुल रस नव्हता, मी उदयपुर बघण्याचा मानस सोडून जयपूर कडे निघण्याचा विचार पक्का केला. सुमारे ११ वाजता मी हॉटेल सोडले. तत्पूर्वी कालच्या पावसाने मला चांगलाच धडा शिकवलेला होता, म्हणून मी व्यवस्थित तयारी करून घेतली. चित्तोडगड मार्गे जयपूर ला जाता येईल असे मला काही लोकांनी सुचविले, भारतात एक चांगले आहे, तुम्हाला येथे GPS बाळगणे गरजेचे नाही, कोणालाही तुम्ही तुमचा GPS बनवू शकता. इतका सुंदर रस्ता मी माझ्या जीवनात बघितलेला नव्हता, जणूकाही माझ्या आगमनासाठी कुणी कारपेट तर अंथरून ठेवले नाहीना? असा सुखद विचार माझ्या मनात आला. मी अनेक ठिकाणी थांबत, 
फोटो काढत पुष्करच्या दिशेने कूच केली. काल दुपारच्या जेवणात मी नवीन धडा शिकलो होतो, लोकल माणसांशी अदबीने वागायचं, एका सुंदर ठिकाणी (माझ्यामते) मला एक फोटो खेचायचा होता, इतक्यात समोरून एक बाइक येताना दिसते, मीही त्याला हात दाखवतो, तो इसम थोडा पुढे जाउन थांबतो. बाईकवरून उतरून तो माझ्या दिशेने आला. मी त्याला विचारले "जी आपका शुभनाम?". एवढा आदरयुक्त प्रश्न आमच्या महाराष्ट्रात कुणीच विचारत नसावा. मला तर अक्षरश: पोटात गोळा आल्यागत झालं. "हमारा नाम रामशरण है". राजस्थान मध्ये फार अदबीने बोलतात. मी त्याला फोटो काढण्यासाठी विनंती केली, तोही आपले काम चोख बजावून आपल्या दिशेने निघून गेला.





पावासने आजही हजेरी लावलेली होती, काल याच पावसाने मला एक जुगाड शिकवलेला होता, हेल्मेटच्या विंडशिल्ड वरील पाणी पुसायला एक फडका मी बाइक च्या आरश्याला बांधूनच ठेवला,तो फडका इतका लांब होता की गाडी चालवता चालवतानादेखील मला सहजतेने काचेवरील पाणी पुसायला मदत होत होती. त्यामुळे मला गाडी सारखी सारखी थांबविण्याची गरज नव्हती. माझा बराचसा वेळ वाचला होता.



तीन वाजता, अजमेर अलीकडे मी जेवण करावे असे ठरवून गाडी एका हॉटेलच्या दिशेने वळवतो. मला कळून चुकले होते की मुंबईत वापरणारा रेनकोट हा लोन्ग रायीड साठी काहीच कामाचा नाही. भिजलेल्या अवस्थेतच मी दाल फ्राय आणि ३ रोटी फस्त केल्या व लगबगीने जयपूर दिशेने आपला वारू उधळला.


 पावसाबरोबर लपंडाव खेळत मी जयपूर पासून ५१ किमी अंतरावर येउन पोहचतो. सुमारे सहा वाजता मी जयपूर दिल्ली जंक्शन पाशी येउन थबकतो. ६ तासात मी ४०५ किमी टप्पा विनासायास पार पडलेला असतो. जयपूर सिटी बघण्यासाठी दोन दिवस लागतील, म्हणून मी दिल्ली पोहचण्याचे ठरवितो. मागचा रेकॉर्ड पाहता ताशी ८० किमी वेगाने वॉर हॉर्स त्याची कामगिरी उत्तमरित्या पार पाडत होता. पुढे अजून फक्त २५४ किमीच तर जायचे आहे. जयपूर टाळून मी दिल्ली गाठायचे ठरवतो व रात्रीचा प्रवास करायचा नाही हा माझा नियम मी मोडतो व त्याचा मला चांगलाच धडा मिळाला. 



माझ्या हेल्मेटचे विंडशिल्ड काळ्या रंगांचे असलेकारणाने रात्री मला ते उघडणे भाग होते, अजून एक धडा मी शिकलो होतो, लोंग रायीड मध्ये हेल्मेट नेहमी पारदर्शक विंडशिल्डचेच वापरायचे किंवा नाईट विजन गॉगल्स वापरावा. रस्त्यावरील काम चालू असल्याने धुळीचे प्रचंड लोट वाऱ्यासरशी डोळ्यांची पार वाट लावून जात होते, हरयाणा रोडवेज च्या बसेस आजूबाजूच्या कोणत्याही वाहनाची पर्वा न करता धूळ, चिखल उडवत पुढे जातात, त्यांनी माझा मराठी बाणा पुरता निस्तेनाबूत करून टाकला होता, मराठी सैन्याला पानिपतावर जशी नामुष्की पत्करावी लागली तशी अवस्था मी होऊ देणार नाही असे ठरवतो. एका बसवाल्यासोबत माझी चांगलीच जुंपते. तो काही केल्या मला पुढे जाऊ देईना, त्याच्या मागच्या टायरने माझ्यावर अनेकवेळा मुद्दामून धुळीचे लोट कसे येतील याची तो पुरेपूर काळजी घेत होता, जवळपास १५ एक मिनिटे हे चालू होते, डोळे अक्षरश: पाण्याने भिजून पापण्या एकमेकांत वेण्या घातल्यागत माझ्या निर्धाराला सुरुंग लावू पाहत होत्या. अनोळखी रस्त्यावर रात्रीचा प्रवास कटाक्षाने टाळला पाहिजे अशी खुणगाठच मी मनाशी बांधली. पुढे ट्राफिक जाम मुळे मला त्या बस पुढे निघता आले व शक्तीने नव्हे तर युक्तीने मला त्यातून माझी सुटका करून घ्यावी लागली. त्यावेळी सुंदरकांडमधील हनुमंत आणि सुरसा राक्षसिणीची गोष्ट प्रकर्षाने आठवली, प्रसंगी स्वतःला लहानपण घेऊन पुढे जाण्यात शहाणपण असते. रात्री १ वाजता दिल्ली 'इंडिया गेट" समोर मी उभारतो, 

दोन दिवसात दिल्ली मला विश्वासच बसत नव्हता. मूळ प्रोग्राम ७ दिवसाचा होता, आता घरी लवकर परत जाता येईल याने मी सुखावतो, तोच एक ६ फुटी पोलिस मला हरयाणवी भाषेत (शिवी वगळता) तेथून लवकर निघण्याचा सल्ला देतो. १५ ऑगस्ट असल्याने सर्वत्र चेकिंग चालू होते. एका चेकपोस्ट पाशी मी पुढे पुढे सरसावत असताना तिथे उभ्या असणाऱ्या अधिकाऱ्याने त्याच्या सहाय्यकास मला बाजूला घेण्याचा आदेशवजा इशारा दिला. त्याने माझे सर्व सामान, माझी ओळखपत्र, गाडीचे कागदपत्र , माझे तेथे येण्याचे कारण, सर्व नीट तपासून मला पुढे जाऊ दिले. इतक्यात पुढच्या पोस्टवरही तीच प्रथा. शेवटी मी त्यांच्यासोबत एक फोटो काढून ठेवला व पुढे येणाऱ्या चेकपोस्टवर तो जणूकाही पास म्हणून वापरीन अशा दिमाखात मी पहाडगंज एरियात दाखल झालो. 




पहाडगंज म्हणजे दिल्लीमधले "दादर". इथे रात्रभर हॉटेल चालू असतात. मी एका हॉटेल मध्ये योग्य ती चौकशी करून आजचा दिवस समाप्त करण्याच्या तय्यारीत असतो. घरी फोन करण्यानिमित्ताने मी फोन चालू केला इतक्यात वर्षाचा फोन वाजला. मागील ६ तास मोबाईल बेटरी लो असलेकारणाने माझा फोन मी बंद ठेवला होता. तिच्याशी बोलून झाल्यावर whatsapp वर बघतो तर ऑफिस ग्रुप वर मला घेऊन पुष्कळ धुमाकूळ माजला होता. मी दिल्ली पोहचल्याचे अपडेट करतो न करतो तर माझ्या प्रिय मित्र "अमित चटर्जीचा" फोन वाजतो. रात्री २ वाजेपर्यंत माझी वाट बघणारा मित्र मी कमावलेला आहे याचा मला आनंद त्याक्षणी झाला. आत्ता उद्या दिल्ली आणि दिल्ली फूड, बस्स!!!!! या सुखद विचारांनी मी निद्रेच्या अथांग डोहात सूर मारला . 

क्रमश: 



3 comments: