Saturday, 6 February 2016

मुंबई ते रोहतांग- भाग पहिला-बाइकवरच बिऱ्हाड- Turning Point

माझा मोठा मुलगा आंजनेय, हा चार वर्षाचा असताना त्याला आम्ही यशवंत नाट्य- सभागृह येथील एका नाट्य-शिबिराला घातले होते. एप्रिल-२०११ रोजीचा महिना होता. एरवी वर्षा त्याला घेऊन अंधेरी ते माटुंगा ये-जा करत होती. एका शनिवारी,काही कारणानिमित्ताने  तिने मला जबाबदारी सोपवली. एक तास कसा घालवायचा या विवंचनेत माझी पाऊले शिवाजी मंदिराच्या दिशेने निघाली. मी तेथील ग्रंथालयात वेळ घालवावा  ठरविले . पुस्तके घेण्यात जितका मी पटाईत आहे, तितकाच ती न वाचता रद्दीत देण्यात देखील माझा हात कोणीच धरू शकत नाही. मी नेहमी प्रमाणे पुस्तक चाळायला सुरवात केली आणि अचानक माझ्या हातात एक पुस्तक आले  "बाइकवरच बिऱ्हाड" (पुणे ते  लेह  ते श्रीनगर / एका कलंदराचा  प्रवास).  मी ते पुस्तक चाळत असताना इतका बेभान झालो  कि मला उशिर झाला हे वर्षाचा फोन आल्यावर कळले. मी आंजनेयला घेऊन कधी एकदा घर गाठतोय आणि पुस्तक वाचतो असे मला झाले. आयुष्यात पहिल्यांदा मी अवघ्या चार तासात  एक पुस्तक वाचून संपवले होते.  त्यातील डॉक्टर अजित हरिसिंघानी यांची जबरदस्त सफर वाचून मला लेह पर्यंत बाईकने जाता येते याची प्रथम कल्पना मिळाली. त्यानंतरच्या दोन वर्षात अनेकदा मी ते पुस्तक वाचून काढले.  


२०१३ रोजी ऑफिस मध्ये संध्याकाळी घरी निघावयास थोडासा उशीर झाला होता, त्याच त्याच रुटीन लाइफ पासून काहीतरी वेगळ केले पाहिजे असं वाटत होतच आतामात्र ते असह्य झाला होता. माझे सहकारी अमित चटर्जी, संदीप सुरोलिया आणि विनोद पिल्लई माझी निघण्याची वाट बघतच होते आणि माझा बांध फुटला. एक दीर्घ सहल करण्याचा माझा विचार त्यांना पटला. पण मला तो बाईकने करायचा आहे अस सांगितल्यावर मात्र त्यांनी मला मुर्खात काढले. मुंबई ते दिल्ली बाइकने जाण्याचा माझा मानस मी त्यांच्या पुढ्यात मांडला. कोणी येवो न येवो मी मात्र जाण्याचा निर्णय नक्की केला. 

मग मी काय काय करायला हव याची यादी केली. 
१. शारीरिक व मानसिक ताकत  वाढविणे : माझे सद्गुरु श्री अनिरुद्धांमुळे यात मला फारसे कष्ट घ्यावे नाही लागले. दर गुरुवारी होणारे त्यांचे प्रवचन मला अध्यात्मातून सर्वांगीण प्रगती कशी साधता येते याची हातोहात प्रचीती देतात. त्यांनी प्रवचनातून दिलेल्या टिप्स जीवनात पावलोपावली कामी येतात. शिवाय त्यांनी स्थापन केलेल्या बल गटाचा अनुभव पाठीशी असताना शारीरिक ताकत वाढविण्यासाठीचे त्यांचे मार्गदर्शन इथे फारच मोलाचे ठरते. किंबहुना याच्या जोरावरच आम्ही सर्व अनिरुद्धांचे श्रद्धावान आमचे वेगळेपण जपतो. 

२. प्रवासात लागणारे  सामान: मी लागलीच सर्व सामान गोळा करण्यास सुरवात केली. सर्व प्रकारचे पाने, पक्कड, ज्यादाच्या टायर टुब्स, क्लत्च  प्लेट, स्पार्कप्लग, एक्सिलेटर वायर, क्लत्च वायर, फूटपंप, डिजिटल कॅमेरा, स्विस चाकू, वेग वेगळ्या ऋतुमानात लागणारे कपडे. (पावसाळी व हिवाळी). 

३. बाइकची माहिती: मी दर शनिवार सुनीलच्या बुलेट वर्कशॉप मध्ये वेळ देऊ लागलो. सुनील हा माझा विश्वसनीय बुलेट मेकानिक . पुढील प्रवासात एकट्याने बेसिक गोष्टी कश्या पार पाडाव्यात याचे त्याने मला ज्ञान दिले होते . एव्हाना मला टायर टुब्स हि बदलता येऊ लागल्या. त्यामुळे थोडासा निश्चिंत होतो.
९/०८/२०१३ ते १५/०८/२०१३ या दरम्यान मी खालील प्रमाणे प्लान बनवला. 

दिवस  १ मुंबई ते अहमदाबाद.
दिवस  २  अहमदाबाद ते  मौन्ट अबू .
दिवस  ३  मौन्ट अबू ते उदयपूर .
दिवस  ४  उदयपुर ते पुष्कर. 
दिवस  ५  पुष्कर ते जयपूर. 
दिवस  ६  जयपूर ते आगरा.
दिवस  ७  आगरा ते दिल्ली.

मी माझा मानस वर्षाला सांगितला नव्हता कारण ती आठ महिन्याची गरोदर होती. ११/०६/२०१३ रोजी अर्जुनचा जन्म झाला. जेव्हा वर्षा घरी आली तेव्हा दोन दिवसानंतर मी तिला माझा मानस सांगितला. ती शांतपणे हसली आणि म्हणाली, मला वाटलच होते तुझं काहीतरी चुळबुळ चालू आहे.आठव्या दिवशी तू मला घरी पाहिजे, आणि कोणतेही कारण चालणार नाही. मला स्वतः वर जितका विश्वास नव्हता त्यापेक्षा प्रचंडविश्वास तिच्या बोलण्यात होता. 

या स्त्रियांकडे एक विलक्षण शक्ती असते, आपल्या नवऱ्याच्या मनातली गोष्ट अगदी बरोबर ओळखण्याची.
८/८/२०१३ रोजी मी ऑफिसमधून साळसूद पणे निघत होतो, कारण जर का मी घाबरून हि रायिड पूर्ण केली नाही तर सर्वांसमोर फजिती होईल हि भीती होती.  इतक्यात माझ्या सहकाऱ्यांनी घेराव घालून माझा रस्ता अडवला, अख्खं डिपारटमेन्ट गोळा झालं. ते सर्व इतके उत्सुक होते कि मला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला.  मी सर्व सामान बांधून ठेवले होते. वारंवार लागणाऱ्या गोष्टी, जसे पेन, छोटी डायरी, ओळखपत्र  , गाडीचे पेपर (प्रत), ब्रेक टाईट करण्याकरिता "पाना" मी माझ्याकडील वेस्ट  पाऊच मध्ये घेतले.

ती अख्खी रात्र मी हाच विचार करत होतो कि माझा निर्णय योग्य आहे कि नाही.
क्रमश:

4 comments:

  1. वा मस्त आम्हाला ही या सफरीबद्दल उत्सुकता लागलीय
    ........खुप छान

    ReplyDelete
    Replies
    1. नक्कीच, पुढील प्रवास सर्व वाचाकांसहच होईल.

      Delete
  2. अर्धवटच सोडलेस रे…
    पुढे काय झाले…. लवकर टाक

    ReplyDelete